Breaking News

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल,… अजित पवार यांना ती पदे देणे हे अनधिकृत होते का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती अनाधिकृत असल्याचं अजित पवार यांच्या वतीने बोलण्यात येत आहे. जर असं असेल तर उपमुख्यमंत्री पदापासून तर विरोधी पक्षनेते पदापर्यंत अजित पवार यांची नियुक्ती करण्याचे पत्र जयंत पाटील यांनी दिले होते. तर हे देखील अनधिकृत होते का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सवाल केला.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आर आर पाटील यांची एक आठवण सांगताना म्हणाले, आपण राजकारणात असताना वैयक्तिक टीका टीपण्णी करायची नसते. पण अजित पवार यांनी आर आर आबा यांच्यावर भरसभेत वैयक्तीक टीपण्णी केली. त्या टीपण्णीमुळे ते २४ तास रडत होते. तसेच वक्तव्य त्यांनी माझ्याबाबत केल्याचे सांगत वरिष्ठ पावसात भिजले म्हणून त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यानेही पावसात भिजत भाषण केले. त्यात माझे पोट दिसले म्हणून असे वक्तव्य केले. आता माझे वयानुसार पोट बाहेर आले म्हणून अशी वैयक्तीक करायची असते का असा सवालही उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ५३ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर २०१९ साली अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना हे माहीत नसावे की आमदारांच्या सह्यांचे ते पत्र चोरण्यात आले होते. त्यामुळेच अजित पवारांना ७२ तासांत राजीनामा द्यावा लागला होता. त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपद आणि त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाचे फायदे भोगले असल्याची आठवणही करून दिली.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, अजित पवारांच्या वकिलांच्या बोलण्यात सतत विरोधाभास जाणवत आहे. एकीकडे ते म्हणतात की, शरद पवारांबद्दल आम्हाला काहीच बोलायचे नाही आणि दुसरीकडे त्यांनीच शरद पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून झालेली नेमणूक बेकायदा असल्याचे सांगत शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगात देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पक्षाचे मालक असल्याप्रमाणे शरद पवारांची वागणूक होती असे लिहिले आहे. प्रफुल पटेल यांनी सप्टेंबर २०२२ रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही एक ठराव घेतला आहे. ज्यामध्ये नेमणुकीचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आम्ही एका मताने देत आहोत असे म्हटले आहे. आणि एकीकडे अजित पवार यांच्यावतीने शरद पवार यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे, हे या पत्रावरून सिद्ध होते की निवडणूक आयोगासमोर करण्यात येत असलेला युक्तिवाद दिशाभूल करण्यासाठी करण्यात येत असल्याचे यावरून हे उघड होत असल्याचा आरोप केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकीकडे युक्तिवाद करताना सांगण्यात येते की शरद पवार यांच्या विरोधात आम्ही नाही. मग तुम्ही पक्ष का फोडत आहात? तुम्ही तुमचा पक्ष का काढत नाही असे देखील विचारले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती, तर ती नियुक्ती देखील अनधिकृत होती का? असा सवाल केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २००४ मध्ये पी.ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निवडणूक आयोगात दावा केला होता त्यावेळी निवडणूक आयोगाने निकाल देत म्हटले होते की, शरद पवार यांच्या सोबत सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संगमा यांना बोलण्याचा अधिकार नाही असे म्हटले होते. संगमा यांनी नवीन पक्ष स्थापन करून पुढे जावावे असे म्हटले होते. आजची परिस्थितीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मधील २८ सदस्यांपैकी १६ सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

Check Also

विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *