Breaking News

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांच्या मागे; जरांगेच्या आरोपाला राजकिय वास

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस लांबत चालल्याचे दिसू लागल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटे येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर येणार असल्याचा इशारा दिला. या आरोपावरून काँग्रेस, शिवसेना उबाठा गटाकडून सावध भूमिका व्यक्त केली. त्यानंतर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाला राजकिय वास असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी केलेले आरोप हे कोणाच्या तरी सांगण्यावरून केल्याचा प्रत्यारोप केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्या आरोपावर ऐकणारे तरी विश्वास ठेवत आहेत का असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संयुक्तरित्या पत्रकार परिषदेला सामोरे गेले.

यावेळी बोलताना अजित पवार यांना प्रसार माध्यमांनी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनात ज्या काही मागण्या केल्या. त्या सरकारने पूर्ण केल्या. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही त्यांच्याकडून अजूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. असे असताना त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे दिसून येते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपा मागील बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असल्याचे दिसून येत आहे. जेणेकरून लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याचा राजकिय लाभ उठविता येईल त्यासाठीच अशा पध्दतीचे आरोप करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हे आरोप करायला लावणारे कोण आहेत याचा तपास झाला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

तसेच जरांगे पाटील यांना सुरक्षा कोण पुरवतंय तर सरकार पुरवतंय. तसेच त्यांच्या प्रवासा दरम्यान ते सुरक्षित रहावेत यासाठी राज्याचे गृहमंत्रीच संरक्षण पुरवित असताना त्यांच्या हेतूबद्दल शंका घेणे योग्य होणार नाही असे मतही अजित पवार यांनी यावेळी मांडली.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. तसेच ते उच्च न्यायालयात टिकवून ठेवले. मात्र सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न गेल्यानंतर मात्र त्यावेळी असलेल्या सरकारने काय केले हे आपणा सर्वांना माहित आहे असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला दिलेले आरक्षण टीकावे यासाठी न्यायालयाने सुचविलेल्या अटींनुसार सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. इतकेच कोणतेही आंदोलन सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती कधी जातो का? असे सांगत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक सच्चा कार्यकर्ता प्रयत्न करत असल्याचे जाणवल्याने मनोज जरांगे यांनी केलेल्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज त्यांनी केलेल्या आरोपाला राजकिय वास येत आहे असा पलटवारही जरांगे पाटील यांच्यावर केला.

शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वप्रथम मी मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले. मी मुख्यमंत्री पदावर असेपर्यंत ते टिकवूनही ठेवले. पण नंतर आलेल्या सरकारने ते आरक्षण का टिकवले नाही असा सवाल करताना इतक्या दिवस जे सत्तेवर होते त्यांनी आरक्षण का दिले नाही. आज दिले तर ते न्यायालयात टिकणार नाही असे सांगातायत.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आरक्षण देण्याचा निर्णय माझ्या काळात घेण्यात आला. त्यानंतर समाजासाठी विविध आर्थिक महामंडळे आणि सारथी सारख्या संस्थांची निर्मिती करत योजनांची व्याप्ती वाढविण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तरीही असे आरोप करण्यात आले. परंतु ते आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे त्यावर ऐकणाऱ्यांचाही विश्वास बसणार नाही असेही सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *