Breaking News

आम आदमीशी मन की, तर अदानी-अंबानी के साथ धन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची टीका

अहमदनगर – कर्जत : प्रतिनिधी

दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्या. आम आदमी के साथ मन की बात अदानी अंबानी के साथ धन की बात… न्याय मांगा तो हो गयी जेल… अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले. त्या ठेवणार्‍याला का ठेवले माहित नाही आणि मलाही का ठेवले माहित नसल्याचा गौप्यस्फोट करत जास्त बोलणार्‍याला आत टाकण्याची भूमिका सरकारने घेतली आणि मी जास्त बोललो तर मला टाकले जेलमध्ये. आणि आता जास्त कोण बोलले तर तुमचा भुजबळ करु अशा धमक्या सरकार देत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय… बेरोजगार दारोदारी फिरतोय कुणी पाहायला तयार नाही. काय चाललंय या राज्यात असा संतप्त सवाल आमदार छगन भुजबळ यांनी केला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील जाहीर सभेत आमदार छगन भुजबळ बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,युवा नेते रोहित पवार,नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके-पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंडपाटील आदींसह अनेक नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्ये हजर होते.

या देशात काय बोलायचं… काय दाखवायचं… काय लिहायचं… काय खायचं यावर बंधनं घातली जात आहेत. टिव्हीवर मोदी विरोधात दाखवले तर त्या पत्रकारालाच काढून टाकले जात आहे अशी स्थिती आहे. मन की बात ही खोटी आहे. घडवून आणलेली आहे हे दाखवणार्‍या पुण्यप्रसून यांना काढून टाकण्यात आले असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले. 

दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्याचे त्यांनी सांगितले.

सत्तेचा माज कशाला अनेक सिंकदर येवून गेले. आता त्याठिकाणी समाध्या उभ्या राहिल्या आहेत हे लक्षात ठेवा. किती दिवस अच्छे दिन तुमचे… आता बचे कितने दिन म्हणण्याची वेळ आल्याचा  टोलाही त्यांनी लगावला.  

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करणार – जयंत पाटील

आपली सत्ता आल्यावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी केल्याशिवाय राहणार नाही असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील दिले.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर उलटसुलट चर्चा केली जात असून त्यांची ईव्हीएममुळे हत्या झाली असे हॅकरने म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

५० टक्के आरक्षण देता येत नाही असे असतानाही आता सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले आहे. सुरुवातीला देता येत नाही म्हणणारे मोदी यांनी आता कसे आरक्षण दिले असा सवाल उपस्थित करत तुम्हाला फसवणारी टोळी दिल्लीत आणि राज्यात आली आहे आणि हीच टोळी घालवण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पाषाणहृदयी सरकारला पाझर फुटत नाहीय- धनंजय मुंडे

या पाषाणह्रदयी सरकारला शेतकऱ्यांच्या अात्महत्या होवूनही पाझर फुटत नाही अशा या सरकारला पायउतार केल्याशिवाय गप्प बसायचे नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

४५ वर्षात एवढी बेरोजगारी वाढली नाही इतकी बेरोजगारी या साडेचार वर्षांत वाढली असल्याचा अहवाल एका संस्थेने दिला. परंतु तो अहवाल सरकारने दाबून ठेवला असून हे सगळं घडलंय ते नोटबंदीच्या निर्णयाने झाल्याचा आरोप त्यांनी केला.

या सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांचे पैसे देवू शकत नाही कारण हे कसे देणार आहे हेच मंत्री भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली केली होती. परंतु आजचे हे सरकार शेतकरी मेला तरी चालेल अशा भूमिकेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

इमानदार चौकीदार आज देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल, तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही. आजची ही अभूतपूर्व सभा आणि इथल्या जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील विश्वास सांगत आहे की इथे परिवर्तन घडणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Check Also

काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?

भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *