Breaking News

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कोअर टीममधील तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ते दिर्घकाळापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत उल्लेखनीय काम केले. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत काम करत असलेले सुधीर जोशी १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर सुरुवातीला त्यांची राज्याच्या महसूल मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांना अपघात झाल्यानंतर त्यांच्याकडील हे पद नारायण राणे यांच्याकडे सोपविण्यात आले. अपघातातून बरे झाल्यानंतर मात्र सुधीर जोशी यांच्याकडे राज्याचे शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. ते शिवसेनेत सक्रिय असताना शिवसेनेला लागणारी आर्थिक रसद पुरविण्याचे कामही त्यांनी केले होते.

संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता असं त्यांचं वर्णन केलं जाते. मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते.

शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांत ते मार्गदर्शन करायचे. महापौर कसा असावा, हे सुधीर जोशींकडून आम्ही शिकलो. त्यांनी शिवसेनेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी लोकाधिकार समितीचं काम सुरू केलं. अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. सुधीर जोशींनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं. प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. उत्तम वक्ते, मितभाषी होते. एक शिवसैनिक म्हणून त्यांचा रुद्रावतार आम्ही पाहिलेला आहे. महसूल मंत्री, शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. दुर्दैवाने त्यांना एक अपघात झाला. त्यांचं शिवसेनेशी कायम नातं राहिलं. शिवसेनेनं सुधीर जोशींच्या रुपात एक अनमोल हिरा गमावला आहे, अशी आदरांजली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाहिली.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *