Breaking News

शरद पवार यांचा टोला, …कुठे जायचे तेथे जावे पण अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा

मणिपूर येथे मागील ४५ दिवस सतत दंगली होत आहेत. केंद्र सरकार ज्याप्रमाणे मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांना पाहत आहे त्यातून तिथल्या लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्याने आम्ही या देशाचे नागरिक आहोत का? असा प्रश्न पत्राद्वारे केला. लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना असे वाटत असेल तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल? देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जायचे तिथे जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त त्यांनी करावा अशी टीका मणिपूर प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

राष्ट्रवादी पक्षाच्या २४ व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्ष सहकाऱ्यांशी संवाद साधला. २४ वर्षांपूर्वी या सभागृहामध्ये छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आपण मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करावा हा निर्णय आपण घेतला आणि संध्याकाळी लाखोंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कला त्यास जनतेचा पाठिंबा मिळाला. त्या दिवसापासून आपण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणातील एक घटक होऊन बसलो. महाराष्ट्रात लोकांनी आपल्याला शक्ती दिली, सत्ता दिली. २५ वर्षांच्या कालखंडात अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सत्तेचा वापर केला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी फिल्म दाखवण्यात आली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सत्तेत असताना घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय दाखवण्यात आले. आपण सर्व घटक हाताळले. शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी, अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलितांचा, भटक्या विमुक्तांचा विचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नोंद राज्यातील जनतेच्या अंतःकरणात झाली केवळ तुम्हा सर्वांच्या कष्टामुळे हे शक्य झाले.

शरद पवार म्हणाले, आपण शेती आणि शेतकरी यांना खूप महत्त्व देण्याचे काम केले. आपल्या हाती असलेल्या सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी केला. आपला देश शेतीप्रधान देश असताना परदेशातून धान्य आयात करण्याची स्थिती बदलली पाहिजे, हे आव्हान स्वीकारले. यातून देशाची गरज भागवून जगातील अन्य देशांना अन्नधान्य पुरवण्याची काळजी घेतली. आज चित्र वेगळे दिसत आहे. घेतलेले चांगले निर्णय नव्या राज्यकर्त्यांनी पुढे न्यायला हवे. पण आज चित्र वेगळे दिसत आहे. आज शेतकरी अस्वस्थ आहे, दुखावला गेलाय. शेतमालाच्या योग्य किमती मिळत नाहीत. शेतकऱ्याची संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत यायची परिस्थिती दिसत असल्याची शक्यताही व्यक्त केली.

शरद पवार यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी तीन वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते. त्यांना आता सत्तेत बसून दहा वर्षे होत आली तरीही हे चित्र दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्याची स्थिती पाहायला मिळते. मागील पाच महिन्यात महाराष्ट्रात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. मात्र आज समाजा-समाजात जाणीवपूर्वक कटुता कशी निर्माण होईल याची खबरदारी राज्यकर्त्यांकडून घेतली जाते. हे यापूर्वी कधी होत नव्हते. महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य असतानाही याठिकाणी दंगल होते. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाची शक्ती जिथे नाही तिथे जातीय तणाव निर्माण करून त्याचा राजकीयदृष्ट्या लाभ कसा होईल हे पाहिले जात आहे. ढिसाळ कायदा व सुव्यवस्था हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. समाजातील लहान घटकांना संरक्षण द्यायचे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. माहिती घेतली असता महाराष्ट्रात या वर्षात तीन हजार एकशे बावन्न मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी आजचे राज्यकर्ते काय करत आहेत यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही शरद पवार म्हणाले.

तसेच नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून शरद पवार म्हणाले, देशात राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश या पदांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपतींना न बोलवण्याचे कारण केवळ प्रोटोकॉलप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा प्रतिष्ठा जास्त असलेल्या पदावरील व्यक्तीला न बोलवणे होते. आजचे राज्यकर्ते अशा पदांची इज्जत राखायची नाही ही भूमिका घेऊन काम करत आहेत असा आरोपही केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशातील लोकशाही, देशातील व्यवस्था यासंबंधी अत्यंत बारकाईने लक्ष देऊन समाज एकसंध कसा राहील याची काळजी घेत आहे. याकडे आपण दुर्लक्ष केले तर ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या हाती उद्याच्या निवडणुकीत पुन्हा सत्ता आली तर या निवडणुका किती काळासाठी आहेत याबाबतची चिंता वाटण्याची स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशातील लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्व पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या २३ तारखेला पाटण्याला याविषयीची बैठक आयोजित करणार आहोत. देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्यावर कोणी आक्रमण करत असेल तर त्या गोष्टी देशात होऊन द्यायच्या नाहीत. लोकांना एकत्रित करून चुकीच्या, सांप्रदायिक, जातीयवादी या प्रवृत्ती आहेत त्यांच्या हाती देश जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या आव्हानाला सामोरे जाणे हा तुमचा आणि माझे कर्तव्यच नाही तर धर्म याची आठवणही शरद पवार यांनी यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करून दिली.

Check Also

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *