Breaking News

नाना पटोले यांची खोचक टीका, त्यांना माणूस व कुत्र्यामधील फरकही समजेना

महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीसही हतबल आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. “गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील” असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा याच्यातील फरकही कळत नाही का? महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिले नाही. भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे हे NCRB च्या अहवालात म्हटले आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूरचा पहिला नंबर लागतो त्यानंतर ठाणे, मुंबई व पुणे या शहरांचा नंबर लागतो. नागपुरच्या अधिवेशनात मी हे आकडेवारीसह मांडले होते. राज्यात खैरात वाटल्यासारखे बंदुकांचे परवाने दिले जात आहे. तडीपार गुंडांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. काही भ्रष्ट व कलंकित IPS अधिकाऱ्यांना नियम डावलून प्रमोशन दिले आहे तर प्रामाणिक व इमानदार अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात आहे. पोलीस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप व दबाव असल्याने तेही काही कारवाई करू शकत नाहीत. गुंडांनी शासन व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल, जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

भाजपाने महाराष्ट्रात गुंडाराज आणले आहे. सत्ताधारी सर्रास धमक्या देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. राज्यातील जनता भयभीत आहे, महिला असुरक्षित आहेत. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे. तीन खोक्यामधील सत्तासंघर्षात जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *