Breaking News

अभिषेक घोसाळकर गोळीबारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरच पलटवार

मागील काही दिवसात राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करत ठार मारल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. तर पुण्यातील अज्ञात इसमांनी भाजपाच्या माजी नगरसेवकावर शस्त्रास्त्राने हल्ला करत खुन करण्यात आला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नऱ्होव्हा या प्रख्यात गुंडाकडून गोळीबार करत ठार मारल्याची घटना कालरात्री घडली. या तिन्ही घटनांवरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे या तिन्ही घटनांवरून उघडकीस आले. यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कारण नसताना विरोधक घडलेल्या गंभीर घटनेचे राजकारण करत असल्याचा प्रत्यारोप संजय राऊत यांच्यावर केला.

वास्तविक पाहता राज्याच्या मुंबई-पुणे सारख्या विकासाची केंद्रे स्थापित झालेल्या शहरांमध्ये भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून प्रतिस्पर्धी असलेल्या राजकिय विरोधकांवर तर त्यांच्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करून ठार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहखाते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील कायदा व सु्व्यवस्था राखण्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

फेब्रुवारी २०२४ च्या सुरुवातीलाच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच पोलिसांच्या उपस्थितीत गोळीबार करत ठार केल्याची घटना घडली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. परंतु त्यानंतर प्रसारमाध्यमांमधून नवनवी माहिती आणि व्हिडिओ फुटेज पुढे आणत या गणपत गायकवाड यांनी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची धार जाणीवपूर्वक बोथट करण्यात आली.

त्यानंतर पुणे येथील भाजपाचे माजी नगरसेवकावर तेथील त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाकडून हल्ला करत जीवे मारल्याची घटनाही नुकतीच घडली. त्यापाठोपाठ मुंबईतील दहिसर मधील प्रभाग एक चे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचीही हत्या करण्यात आली. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात समेट करण्याच्या अनुषंगाने चर्चेला बोलावायचे आणि प्रतिस्पर्ध्याचा नायनाट करायचा अशी नवी रणनीती सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकारण्यांकडून अवलंब करण्यात येत आहे. या नव्या पध्दतीचा वापर वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.

मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाबाजूला झालेल्या घटनांबद्दल बोलताना चुकीचे घडल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली खरी परंतु राजकीय वैमन्यास्यातून घोसाळकर यांची हत्या झाल्याचा दावा केला. परंतु हा दावा करताना गाडी खाली श्वान आला तरी विरोधक गृहमंत्री पदाचा राजीनामा मागत असल्याचे सांगत गृहमंत्री पदावरील व्यक्ती या घटनेस जबाबदार नसल्याचे सांगत एकप्रकारे विरोधकांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राजीनामा देणार नसल्याचे सांगत विरोधकांच्या मागणीला तिसऱ्यांदा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार केला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *