Breaking News

आदित्य ठाकरे यांची त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका, मुंबईत असा निर्लज्जपणा…..

मुंबईत पहिल्या पावसानंतर पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाणी साचलं हे काय सांगता, पाऊस आला याचं स्वागत करा असं वक्तव्य केलं. यानंतर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करत मुंबईत एवढा निर्लज्जपणा आणि नाकर्तेपणा कधीच पाहिला नाही, असं म्हणत टीका केली.

शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आहे. भ्रष्टाचाराचा कोणता चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे. माजी महापौर आणि सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात काम केली आहेत. पण, कधीही कोणी मुंबईकरांना असे उत्तर दिलं नाही, की तक्रार काय करता, याचं स्वागत करा.

तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसाठी जेव्हा महामार्गावरील गाड्या थांबवल्या जातील. तेव्हा मुख्यमंत्री बोलतील, ‘तुम्ही गर्दीत अडकलाय, तक्रार काय करता. माझं स्वागत करा.’ एवढा निर्लज्जपणा, नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही, असा खोचक टोलाही लगावला.

गेली एक वर्ष मुंबईसह महाराष्ट्रात खोके सरकार आहे. मुंबई महापालिकेवर सरकारची हुकूमशाही चालू असताना वेगवेगळ्या कंत्राटात मोठे घोटाळे करण्यात आले. रस्त्यांचे घोटाळे मी समोर आणले. जे घोटाळे झाले, त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. नंतर चौकशी होऊन ज्यांना अटक करायची, ती आमचं सरकार आल्यावर करू, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.

आदित्य ठाकरे यांनी पुढे शिंदे सरकारवर आरोप करताना म्हणाले, खडी, सॅनिटरी पॅड, स्ट्रीट फर्निचर, सुशोभीकरणाच्या कामात घोटाळे करण्यात आले. शनिवारी मुंबईत पाऊस पडला. मुंबईकर पावसाचं नेहमीच स्वागत करतात. पण, मुंबईकरांनी गर्दीत अडकल्यावर, पाणी तुंबल्यानंतर ट्वीट केले. मात्र, मुंबई महापालिकेचे अधिकारी कुठेच दिसले नाहीत, अशी टीकाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *