Breaking News

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ निर्देश आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा

राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आठ वरिष्ठ पदांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. सध्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांना या पदाचा तात्पुरता कार्यभार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे प्राधिकरण म्हणजे क्रांतिकारक पाऊल असून त्याच्या स्थापनेमागचा हेतू चांगला आहे. त्यामाध्यमातून रुग्णालयांना, आरोग्यसंस्थांना वेळेवर औषधे आणि उपकरणे उपलब्ध झाले पाहिजे. प्राधिकरणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, असे यावेळी सांगितले.

प्राधिकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या संस्थेची विश्वासार्हता वाढवावी. त्याची कार्यपद्धती पारदर्शक राहिल्यास खासगी रुग्णालये देखील या प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधे खरेदी करू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राधिकरणाचा कार्यक्रम आराखडा, २७०० विविध औषधे आणि साहित्य खरेदी, कंत्राटी पद्धतीने पदभरती आदी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव नविन सोना, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आरोग्य आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *