मागील काही दिवसांपासून औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यावरून ठिकठिकाणी वाद निर्माण होत आहेत. यामुळे राज्यातील राजकिय वातावरण तापले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद येथील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देत त्याच्या मजारवर फुलेही वाहीली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी संवाद साधला असता ते म्हणाले, औरंगजेबाने ५० वर्षे राज्य केले. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगजेबाचं राज्य का आलं हे बाबासाहेबांनी सांगितले आहे की, तो येण्याआधी जयचंद इथे आला. त्यानंतर औरंगजेब आला आणि राज्या राज्यामध्ये जयचंद झाले. त्यामुळे औरंगजेबाला शिव्या घालण्याआधी त्या जयचंदला शिव्या घाला. तसेच त्यांच्या औरंगजेबाच्या दरबारात ज्या जयचंद सारख्यांनी नोकऱ्या केल्या त्यांना हिम्मत असेल तर शिव्या घाला. त्यामुळे औरंगजेबाला शिव्या का घालता असे प्रतिआव्हानही भाजपाच्या नेत्यांना दिले.
तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, काही जणांची श्रध्दा असते काही जणांची नसते. त्यामुळे लोकांची जर श्रध्दा आहे त्याला विरोध करण्याचे काय कारण असा सवालही केला.
तसेच राज्यात सतत होत असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी जर मुख्यमंत्री असतो तर दोन दिवसात दंगली बंद केल्या असत्या असे सांगत अप्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
या भेटीनंतर शिवसेनेची कोंडी होऊ शकते? या प्रश्नावर मोजक्या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. “या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.