Breaking News

सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती,… फारसे मनावर घेऊ नका

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन होते, म्हणून अशी वक्तव्य केली जातात, असं अजित पवारांनी म्हटलं.

मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी बारामतीत अडवलं होते, ते पुन्हा मराठवाड्यापर्यंत पोहचवण्याचं काम आमचं सरकार करत आहे. आमचं सरकार असताना कृष्णा प्रकल्पाला निधी देऊन त्याच्या बोगद्याच्या कामाला सुरूवात केली. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. पण, अडीच वर्षे महाराष्ट्रातील सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यतेचा एक शब्दही दिला नाही, असा आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

यावर अजित पवारांनी सांगितलं, बारामतीत कोणतेही पाणी अडवलं नाही. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी वस्तुस्थिती सांगावी. पाणी देत असताना विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथेच बैठका झाल्या. तेव्हा महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळच्या अधिकारात येणारं मराठवाड्याचं हक्काचं पाणी, जे उस्मानाबाद आणि बीडला मिळणार आहे, ते त्यांना मिळालं पाहिजे, असा निर्णय झाला.

निरेचं पाणी चंद्रभागेस न जाता इंदापूरमधील एका बोगद्याद्वारे उजनीत आलं. उजनीतून उचलून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्याचा निर्णय झाला. बोगद्याचं काम होण्यास वेळ लागतो. त्यात बारामतीचा प्रश्न आला कुठे. फक्त बारामती नाव घेतलं की, त्याला वेगळं महत्व प्राप्त होते. ब्रेकिंग आणि हेडलाईन होते, म्हणून वक्तव्य केली जातात, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत एक आगळंवेगळं विधान केलं. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. खासदार सुळेंच्या विधानावर आता स्वत: अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भावाच्या प्रेमापोटी सुप्रिया सुळेंनी तसं वक्तव्य केलं असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यात काय चुकीचं आहे, सुप्रिया सुळेंच्या या विधानाबाबत विचारलं असता हास्य करत अजित पवार म्हणाले, सुप्रिया सुळे माझी बहीण आहे. भावाच्या प्रेमापोटी ती मला अमिताभ बच्चन म्हणाली असेल. पण तुम्ही तेवढं मनावर घेऊ नका.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत संवाद साधताना अजित पवार पुढे म्हणाले की, पत्रकार मित्रांनो, मी जेंव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा कधी ‘अँग्री यंग मॅन’पणा दाखवला आहे का? मी माझं काम करत असतो. जे माझ्याकडून काम होईल ते करायचं आणि जे होणार नाही, ते नाही होणार म्हणून सांगायचं, ही माझ्या कामाची पद्धत आहे. माझा स्वभाव ‘अँग्री यंग मॅन’सारखा असता तर माझ्या मतदारांनी मला सात वेळा प्रचंड मताधिक्यांनी निवडून दिलं असतं का? मागच्या वेळी तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी मला निवडून दिलं. एक लाख ६८ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणं, हे येड्या-गबाळ्याचं काम नाही. यासाठी बारामतीकरांना मी धन्यवाद देईन. इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे आपलं कामाशी नातं असलं पाहिजे.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *