Breaking News

रुग्ण सेवा, मनुष्यबळ नियंत्रणासाठी ‘वॉर रुम’ तयार करा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आदेश

आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रुग्ण सेवेसाठी उपकेंद्र आता ‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर’मध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रुग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले.

उपकेंद्रस्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या कामाचे मूल्यमापन, उपस्थिती, रुग्ण सेवा आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे सादरीकरण आज मंत्रालयीन दालनात मंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर, सहसचिव विजय लहाने, ट्रान्स ग्लोबल जिओनॉटिक्स कंपनीचे श्रीनिवास आदी उपस्थित होते.

ॲपच्या अनुषंगाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या सूचना देत मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना ॲप हाताळणी, भरावयाची माहिती याबाबत विभागनिहाय कार्यशाळा घेवून प्रशिक्षित करावे.
राज्य कामगार विमा योजनेची मुंबईत अंधेरी, वरळी, मुलुंडसारख्या ठिकाणी रुग्णालये आहेत. मात्र, येथील खाटांच्या संख्येच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. केंद्र शासनाकडून मिळत असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. रुग्णांलयामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले. ही रुग्णालये महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमार्फत चालविणे शक्य नसल्यास आरोग्य विभागाच्या अंतर्गत चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. राज्य कामगार विमा सोसायटीच्या बैठकीला संचालक डॉ. अलंकार खानविलकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *