Breaking News

घरबसल्या करोना चाचणी करायची मग वापरा हे ऑनलाईन टूल राज्य सरकारकडून स्वचाचणी टूलची निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी

करोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर करोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टूल सर्वांसाठी https://covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे.

हे स्व-चाचणी टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोविड -१९ चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे, महत्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच योग्य जनजागृती करून विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य हेतू आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि केंद्र व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करोनासदृश्य लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे विलगीकरण करणे आणि तीव्र लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पण बऱ्याच नागरिकांमध्ये काही किरकोळ (निम्न) लक्षणे जसे की सर्दी, ताप, खोकला, ज्यांचा करोना व्हायरस संसर्गाशी संबंध नसू शकतो, अशा वेळेस नागरिक घाबरून न जाता या टूलच्या आधारे  योग्य ती कार्यवाही करू शकतात. अशा बाबतीमध्ये प्राथमिक पातळीवर आपल्या घरीच स्व-चाचणी करता यावी यासाठी महाराष्ट्र शासन व अपोलो २४x७ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेल्फ असेसमेंट टूल बनविण्यात आले आले.

विशेष बाब म्हणजे, या प्लॅटफॉर्ममुळे प्रशासनाला चाचणी घेतलेल्या नागरिकांचा रिअल टाइम डॅशबोर्डही बघता येतो. तसेच इतर स्व-चाचणी टूल फक्त परिणाम दर्शवितात, मात्र या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये करोनासदृश्य लक्षणे ही मध्यम किंवा उच्च स्वरूपाची असल्यास अशा व्यक्तीचे‌ वैयक्तिक तपशील प्रशासनापर्यंत पोहोचवले जातात. यामुळे प्रशासनाला सक्रीय पद्धतीने संभाव्य संक्रमणास अधिक प्रभावीपणे शोधण्याची मदत होईल. हे सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल प्रत्येकाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर कोविड 19 रोखण्यासाठी ‘काय करावे’ आणि ‘काय करु नये’ (Dos & Don’ts), हेल्पलाइन क्रमांक आणि संबंधित माहिती देखील उपलब्ध आहे. डॉक्टरांकडून दूरध्वनी, व्हिडिओ कॉलद्वारे आरोग्य सेवेचा सल्ला घेण्यासाठीची सुविधाही लवकरच उपलब्ध होईल.

हा प्लॅटफॉर्म, क्युआर कोड रूपात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खाजगी दवाखाने येथेही उपलब्ध होणार आहे. जेणेकरुन तिथेही रुग्णांना स्व-चाचणी करता येईल. या नोंदी केल्याने प्रशासनाला सतत अद्ययावत होणारा डॅशबोर्ड पाहता येईल आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेता येतील.

या प्लॅटफॉर्मच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी – भारत सरकार, कौशल्य विकास विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी – महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशनचा उपक्रम), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन या संस्थांचा महत्त्वाचा सहभाग राहीला.

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *