Breaking News

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या आश्वासनानंतर संयुक्त किसान मोर्चाचे (अराजकीय) प्रस्तावित आंदोलन मागे

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन करून त्या मार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती मंत्री मुंडे यांनी दिली.

या बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा अराजकीय बळीराजा शेतकरी संघटना तसेच ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेतल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून लवकरच हे अनुदान वितरित करण्यात येईल. ऊर्जा, महसूल, पशु संवर्धन, सामाजिक न्याय आदी विभागांशी निगडित मागण्यांच्या संदर्भात संबंधित विभागांशी लवकरच स्वतंत्र बैठका घेऊन त्या मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतले जातील. ऊसतोड कामगारांबरोबरच वाहतूकदार यांचा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामध्ये समावेश करणे, तसेच त्यांच्या विविध मागण्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे या संदर्भात विशेष सहाय्य विभागाशी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन तेही निर्णय घेतले जातील, अशीही माहिती मंत्री मुंडे यांनी दिली.

या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड तसेच संघटनेचे राजू पाटील , संदीप गिड्डे पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केले तसेच सरकारने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *