कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य वाटप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४ हजार १९४.६८ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या १० सप्टेंबरपासून अर्थ सहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणी बाबत आढावा बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १००० रुपये तर ०२ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ हजार ५४८.३४ कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २ हजार ६४६.३४ कोटी रुपये असे एकूण ४ हजार १९४.६८ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम २०२३ च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थ सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती ३० ऑगस्ट २०२४ रोजी शासनाने जाहीर केली आहे.

धनंजय मुंडे यांनी २०२३ सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती; त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.

फलटण येथील पीएम किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थींना तात्काळ लाभ घ्यावा

फलटण जिल्हा सातारा येथील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सुमारे ३ हजार ६०० प्रलंबित लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून लाभ देण्यात यावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

फलटण जिल्हा सातारा येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते नियमितपणे मिळण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री मुंडे बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, फलटण कृषी विभागीय अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, फलटण जिल्हा सातारा येथील पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सुमारे ३ हजार ६०० लाभार्थींना भूमी अभिलेख नोंदी, ई-केवायसी व बॅंक खाती आधार संलग्न व इतर अनुषंगिक बाबींमुळे लाभ मिळण्यास अडचणी येतात. या अडचणी विभागाने तत्काळ सोडवून लाभ देण्यात यावा.तसेच यासाठी लागणारे अतिरिक्त कर्मचारी तत्काळ उपलब्ध करून घ्यावेत असे ही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीत प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *