Breaking News

स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थ्यांचा सहभाग कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्री लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहाय्यक महाव्यवस्थापक जयशीला तांबे, टीम लीडर परशुराम सुपल यावेळी उपस्थित होते.

सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोबोटिक, मोबाईल रिपेअर संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनचे उपाध्यक्ष गौरव अरोरा यांच्या संकल्पनेतून तसेच इनोव्हेशन स्टोरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी रोबोट निर्माण करीत आहेत. जिनेव्हा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाभली आहे.

भांडुप येथील रामानंद आर्य डीएव्ही कॉलेज येथे शिकणारा प्रीतम संतोष थोपटे, बोरिवली येथील श्री भाऊसाहेब वर्तक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी पारस अंकुश पावडे, माटुंगा येथील डीजी रुपरेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित संजय साठे, सायन येथील गुरुनानक हायस्कूलचा विद्यार्थी सुमित रमेश यादव आणि वांद्रे येथील माऊंट कार्मेल चर्चची विद्यार्थिनी निखत नईम अहमद खान यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगाने कार्बन कॅप्चर, आपल्या पर्यावरणावर कार्बन डाय-ऑक्साइडच्या होणाऱ्या प्रभावाकडे लक्ष वेधून घेणे, त्याचबरोबर पर्यावरणाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटचा वापर होऊ शकणार आहे. जगभरातील सुमारे १८० हून अधिक देश या स्पर्धेत सहभागी होतील.

मंत्री लोढा म्हणाले की, महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवक-युवती विविध क्षेत्रात यश मिळवीत आहेत. शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील नवयुवक रोबोटिक सारख्या क्षेत्रात करत असलेल्या या कामगिरीतून अनेकांना प्रेरणा मिळेल. या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील दुपारपर्यंतचे मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *