Breaking News

शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा, एकिकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलयचं अन… बिल्कीस बानो प्रकरणावरून केली टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच टीका केली. नवी दिल्लीत आज आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. हाच महिलांचा सन्मान आहे का? असा थेट सवाल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १५ ऑगस्टचं भाषण ऐकलं. त्यात ते महिलांविषयी खूप चांगलं बोलले, महिलांच्या सन्मानाविषयी बोलले. एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. बिल्किस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वांना माहिती आहे असेही ते म्हणाले.

हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतर गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगली माणसं म्हणतं सोडून देतं. हा महिलांचा सन्मान आहे का? पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशाला महिलांविषयी जी दिशा दाखवली तो हाच रस्ता आहे का? यातून सरकार देशाला काय संदेश देत आहे? असा सवालही त्यांनी केला.

गुजरात सरकारने केलेलं हे काम अत्यंत चुकीचं आहे. मात्र, हेच त्यांचं धोरण आहे, हीच त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आज देशात अल्पसंख्याक समाजाबाबत शंका उपस्थित होत आहेत, असेही ते म्हणाले.

तसेच देशातील ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तेथे आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर कारवाया केल्या जात असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील एका आमदाराचंही उदाहरण दिलं. तसेच हा आमदार काँग्रेसचा होता आणि तो भाजपात गेल्याचा किस्सा सांगितला.

देशात जेथे भाजपाची सत्ता नाही त्या राज्यात केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग होत आहे. पश्चिम बंगालमध्ये दररोज या गोष्टी पाहायला मिळत आहेत. कधी आमदारा विरोधात, कधी खासदारा विरोधात आणि कधी मंत्र्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू आहे. गावाकडे आधी लोकांना पोलीस केस माहिती होती. काही काळाने सीबीआय माहिती झाली. आता ईडीची ओळख झाली असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

गावाकडे विचारतात ईडी काय आहे? आता शेतकरी गावाकडे काही गोंधळ झाला तर सहकाऱ्यांना व्यवस्थित वाग, नाहीतर मी तुझ्यामागे ईडी लावेन असा इशारा देतो अशी खोचक टीकाही त्यांनी ईडी यंत्रणेवर केली.

मी काही भाजपाच्या नेते आणि आमदारांची वक्तव्ये पाहिली. आमच्याकडे महाराष्ट्रात आधी काँग्रेसमध्ये असलेले एक आमदार आता भाजपात गेले. त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही असं का केलं? ते म्हणाले की, मी पक्ष बदलला, भाजपात गेलो आणि आता मला अगदी व्यवस्थित झोप येतो. आता माझ्यामागे ईडी नाही असे सांगत ते पुढे म्हणाले की, भाजपाकडे एक धुलाईचं मशिन आहे. त्यात गेलं की नेते स्वच्छ होऊन बाहेर येतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *