Breaking News

मुख्यमंत्री शिंदेच्या इशाऱ्यानंतर आज शिंदे गट- मविआ आमदार भिडले एकमेकांशी रोहित पवार आणि सुरक्षा रक्षकांनाही आवरले नाहीत शिंदे गटाचे आमदार

आतापर्यंत महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात सौजन्य आणि मैत्री सौहार्दाचे असलेले चित्र आज पहिल्यांदाच बिघडल्याचे विधान भवनाच्या आवारात राज्याच्या जनतेला पाह्यला मिळाले. काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिठ्या काढण्याचा इशारा देत सहनशीलता संपेल अशी वेळ आणू देऊ नका असे आवाहन विरोधकांना केले. मात्र आज विरोधक महाविकास आघाडीच्या आंदोलनाची जागा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घेतली. तर सत्ताधारी उभे असलेल्या जागेच्या पुढील जागेवर विरोधी आमदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधक आमदारांमध्ये जावून धक्काबुक्की केल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

नेहमीप्रमाणे विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर उभे राहून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा आंदोलन करत होते. मात्र आज महाविकास आघाडीचे आमदार पायऱ्यांवर येण्याआधीच सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांनी विरोधकांची जागा घेतली. मात्र विरोधकांनी सत्ताधारी आंदोलन करत असलेल्या आमदारांच्या पुढील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर उभे राहुन राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु केले.

सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांकडून पवार आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. तर विरोधकाकडून ५० खोके एकदम ओके, ओला दुष्काळ जाहिर करा अशा घोषणा देण्यात येत होत्या. मात्र सत्ताधारी पक्षाचे आमदार तथा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले, सातारच्या आमदार महेश शिंदे हे विरोधी आमदारांमध्ये जाऊन महाविकास आघाडी नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न सुरु झाला.

त्यातच महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याबरोबर धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. तसेच महेश शिंदे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला.

या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आणि शिंदे गटाच्या आमदारांना एकमेकांपासून वेगळा करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच विधान भवनाच्या सुरक्षा रक्षकांनीही शिंदे गटाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमकपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत धक्काबुक्की सुरुच ठेवली. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना याची माहिती कळताच ते तडक विधान भवनाच्या पायऱ्या असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना सोबत घेवून आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही घटनास्थळी गेले. त्यांनीही त्यांच्या समर्थक आमदारांना त्या जागेवरून घेवून गेले.

शेतकर्‍यांना सरकार देणार काय… गाजराशिवाय इतर काय… सरकारचे एकच उत्तर शेतकर्‍याच्या हाती गाजर गाजर… गाजर देणे बंद करा… ओला दुष्काळ जाहीर करा… अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला…

दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत होते त्याचवेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी गाजराच्या माळा घेऊन पायर्‍यांवर येत घोषणाबाजी केल्याने संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी विरोधी आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केला त्याचवेळी आमदार अमोल मिटकरी मध्यस्थीसाठी गेले असता आमदार महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली त्यामुळे राष्ट्रवादी आमदार आणि शिंदे गटात जोरदार धक्काबुक्की झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सत्ताधारी शिंदे गटाला महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनाच्या पायर्‍यांवर येऊन देत असलेल्या घोषणा जिव्हारी लागत असल्याने आज त्यांनी अगोदरच विरोधात आंदोलन केले. मात्र विरोधी पक्षाच्या आंदोलनाच्या ठिकाणीच सत्ताधारी आंदोलन करत असल्याने सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार समोरासमोर आल्याने ही परिस्थिती उद्भवली.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *