Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची पत्राद्वारे शेतकऱ्यांना साद, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया… छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया

राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला.

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचून दाखविले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र लढवय्यांचा… कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची आणि देशाची भूक भागवण्याचेही काम करीत आहात. म्हणून मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून मन विषण्ण होऊन जाते. आपल्याच घरातले कुणी आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं…’ त्याप्रमाणे तुम्ही खचून न जाता तुमचा तोलामोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांना घातली.

मी तुमच्यासारखा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात, आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश असते. मी आणि माझे सरकार सतत तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणे बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना.. चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया आणि आपण मिळून छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे केले.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *