Breaking News

संसदेची सुरक्षा विकसित भारतात नाही का? पंतप्रधान मोदी,अमित शाह कधी बोलणार

शहिद भगतसिंग यांनी ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताला स्वातंत्र मिळावे म्हणून आणि त्यावेळच्या तरूणाईचा आवाज पोहोचविण्यासाठी ब्रिटीश संसदेत कमी तीव्रतेचे बॉम्ब टाकत देशातील जनतेचे म्हणणे मांडणारी काही पत्रके भिरकावली होती. अगदी तशाच पध्दतीची कृती देशातील ६ तरूणांनी मोदी-शाह यांनी गुलामी मानसिकतेमधून बाहेर पडले पाहिजे म्हणून नवी संसद (सेंट्रल व्हिस्टा) उभारलेल्या संसदेत सुरक्षा यंत्रणांना चकवा देत संसदेतील लोकसभा सभागृहात आणि संसदेच्या आवारात घोषणाबाजी आणि धुर फेकत आंदोलन केले. त्यांच्या कृतीचे समर्थन लोकशाही मानणाऱ्या कोणाकडूनच होऊ शकत नाही.

या सहा जणांमध्ये एकजण म्हैसूर, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यातील सहा तरूणांचा समावेश होता. बर हे सहा ही जण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही बऱ्यापैकी शिक्षण घेतल्याची माहिती पुढे आली.
वास्तविक पाहता मागील आठवड्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना पाकव्याप्त काश्मीर प्रश्नी बोलताना पुन्हा स्वतंत्र भारताचे (इन्डीपेंडट इंडिया) चे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरले.

तसेच पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे नेते होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या चुकांची जबाबदारी काँग्रेस का स्विकारत नाही असा थेट सवाल करत काँग्रेस पक्षावर यथेच्छ टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या संकल्पनेनुसार एखादी चुकीची घटना घडली तर त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री म्हणून आपल्यावर राहिल असे सांगत चुकांच्या जबाबदारीपासून पळणारे आम्ही नाही असे वक्तव्य छातीठोकपणे लोकसभेत अमित शाह यांनी केले.

त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच देशातील बेरोजगारी, महागाई, धार्मिक तेढ आदी प्रश्नी देशातील सहा तरूणांनी भाजपा खासदाराच्याच शिफारस पत्राच्या आधारे संसदेत प्रवे मिळविला. त्यानंतर झालेला प्रकार जो काही आहे तो देशाने दूरचित्रवाहिनीच्या माध्यममातून पाह्यला. परंतु त्यानंतर संसदेतील राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षांनी या प्रश्नी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली. तर उलट उपराष्ट्रपती असलेल्या जगदीप धनकड यांनी आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी मोदी-शाह यांना उत्तर देण्याची मागणी केली म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतून तब्बल १५ खासदारांना निलंबित केले.

संसदेतील सुरक्षा भंग झाल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पावेतो जवळपास ४ ते ५ जाहिर कार्यक्रमांना हजेरी लावली. तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत संसदेच्या सुरक्षा भंग झाल्याच्या घटनेवर थोडक्यात भाष्य करत तो विषय संपविला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत किंवा संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या मागणीनुसार हजर रहात अद्याप स्पष्टीकरण दिले नसल्याचे दिसून येत आहे.

प्रश्न देशातील ईशान्य भारताचा भाग असलेल्या काही राज्यांमध्ये हिंसाचार थांबलेला नसतानाही त्या राज्यांच्या दौऱ्यावर न जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीत महिला कुस्तीगीरांच्या झालेल्या अत्याचार प्रकरणी, शेतकऱ्यांच्या मोर्चा आंदोलन प्रश्नी, यासह अनेक महत्वाच्या प्रश्नावर सातत्याने मुग गिळून बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतातरी तोंड उघडणे अपेक्षित होते. परंतु त्यांचे मुग अद्याप संपलेले दिसत नाही. तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभकडे अद्याप फिरकले नाहीत अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात आमच्या चुकांची जबाबदारी असल्याचे जाहिरपणे सांगणारे अमित शाह हे आता त्यांच्या कार्यकाळात झालेल्या मोठ्या चुकांची कबुली द्यायला का धजावत नाही असा प्रश्न सातत्याने सुज्ञ नागरिकांमध्ये आणि राजकिय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *