Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शाह यांनी सांगितले अपमान सहन कर पण… पोहरा देवीची खोटी शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली

उद्धव ठाकरेंनी नुकताच विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात करताना पोहरा देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी भाषण करताना सांगितलं की, पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो भाजपाने फसवलं. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देताना म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर माफी मागितली असेल असं म्हणत २०१९ ला काय घडलं त्याचा घटनाक्रम कथन केला. तसंच आपण धर्मानेच वागतो आहोत असे स्पष्ट करत अमित शाह यांनी मला सांगितले की, अपमान सहन कर मात्र बेईमानी केली तर सोडू नकोस असा सल्ला दिल्याचेही आवर्जून सांगितले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये भाजपा शिवसेना युतीचे पूर्ण बहुमत आले होते आणि सरकार बनणार हे जवळपास निश्चित झाले होते. तत्पूर्वीही मुख्यमंत्री भाजपाचा असेल हेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वारंवार सांगितले होते. मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपण मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडत असल्याचे सांगितले आणि पुन्हा चर्चा सुरु करून पालघरची जागा देऊन मुख्यमंत्री पदाचा विषय संपल्याचे जाहीर केले होते. मात्र, निकालानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसली आणि ऐनवेळी त्यांनी सत्तेसाठी आमच्याशी संवाद बंद करून काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली. २०१९ साली ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला होता आणि त्यांच्या या कृतीला केवळ बेईमानीच म्हणतात, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटप्रमुख’ उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. आजकाल काही लोक खोट्या शपथा घेत आहेत. पोहरादेवीला खोटी शपथ घेताना त्यांनी देवीची माफी मागितली असेल, असा टोलाही त्यांनी उद्धव यांना लगावला.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना सांगितले की, तीन दिवसांनी एक मध्यस्थ माझ्याकडे आले, त्यावर ते म्हणाले की उद्धव ठाकरेंची पुन्हा चर्चेची इच्छा आहे. मी म्हटलं पुन्हा बोलायचं असेल तरीही अट तीच आहे. त्यावर ते म्हणाले की त्यांनी आग्रह सोडला आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की पालघरची जागा जी आपण जिंकलो होतो, ती आम्हाला हवी. पालघरची जागा दिली तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यावेळी मला नेते असं म्हणाले की एखाद्या जागेसाठी युती तोडणं योग्य नाही. आम्ही बसलो, मुख्यमंत्रीपदाचा विषय सील झाला. पालघरची जागा त्यांना दिली. त्यानंतर युती झाली आणि मी पुन्हा सांगतो की ज्या बाळासाहेबांच्या खोलीविषयी ते वारंवार सांगतात त्याच खोलीत उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मी होतो. काही काळ आधी ते बसले होते. मला बोलवण्यात आलं सगळ्या गोष्टी दूर झाल्या आहेत आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे की पत्रकार परिषदेत तू एकट्याने बोलायचं आम्ही बोलणार नाही. मी मराठीत काय बोलणार आहे ते बोलून दाखवलं. हिंदीत बोलून दाखवलं. त्यानंतर वहिनी आल्या (रश्मी ठाकरे), त्यांच्यासमोरही बोलून दाखवलं. अशा गोष्टी सांगायच्या नसतात पण मला सांगायची वेळ आली आहे. मी पुन्हा वहिनींसमोर म्हणून दाखवलं आणि तंतोतंत तेच पत्रकार परिषदेत बोललो. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे शब्द होते की मी खूप टोकाचं बोलून गेलो आहे, आमचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोला. त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दांमध्ये बोललो आणि ती पत्रकार परिषद संपली.

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर जाता? हा दगा, हा खंजीर देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता, देवेंद्र फडणवीस निमित्त होतं. हा खंजीर भाजपाच्या पाठीत खुपसला. ज्या भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो पक्ष उभा केला त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. याचं उत्तर देणं आपल्याला गरजेचं होतं. त्यावेळी मला अमित शाह यांनी सांगितलं की तू दहा अपमान सहन कर, पण बेईमानी सहन करु नको. जो बेईमानी सहन करतो तो टिकत नाही हे मला अमित शाह म्हणाले होते. ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धवजींचा पक्ष जिंकण्यासाठी घाम गाळला ही त्यांच्याशी ही बदनामी होती. म्हणून एकच गोष्ट सांगायची की आज आपण जे करतो आहे तुमच्या मनात शंका असू देऊ नका. हा धर्म आहे हा अधर्म नाही. कर्णाची कवच कुंडलं काढल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे कृष्णाला माहित होतं. दुर्योधनाला गांधारीकडे जाताना कपडे घालायला लावले. भीष्मांना पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरवलं. सूर्यास्त भासवून जयद्रथ वध करवला. सर्वात महत्त्वाचं द्रोणाचार्यांचा वध करताना धर्मराजाला सांगितलं तुला खोटं बोलायचं आहे त्यावेळी धर्मराज युधिष्ठीराने सांगितलं की मी सांगेन अश्वत्थामा गेला हे सांगेन पण नरो वा कुंज रोवा म्हणजे नर मारला की हत्ती मारला गेला माहित नाही. कृष्णाने काय केलं? युधिष्ठीर वाक्य म्हणत असताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना अश्वत्थामा गेला इतकंच ऐकू आलं. त्यामुळे महाभारताने आपल्याला सांगितलं की हा अधर्म नाही ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. परित्राणाय साधूनाम लक्षात आहे पण विनाशाय दुष्कृताम हे देखील लक्षात ठेवावंच लागेल. अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. पण नैतिकतेने राजकारण करण्यासाठी राजकारणासह रहावं लागतं. महाभारतात श्रीकृष्णाला माहित होतं की धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावी लागते.

दरवाजे खुले पण तुष्टीकरणाला थारा नाही !
भविष्यातील भाजपच्या बदलत्या राजकीय समीकरणांवर फडणवीसांनी सूचक विधान केले आहे. ”राष्ट्रप्रथम हा आमचा विचार आहे. येत्या काळात ज्यांना आमच्या सोबत यायचे आहे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. जे येतील त्यांना सोबत घ्यायला आम्ही तयार आहोत, मात्र तुष्टीकरणाचा विचार असणारे पक्ष आम्ही सोबत घेणार नाही,’ अशी स्पष्टोक्ती फडणवीसांनी यावेळी केली आहे. ”उद्धव ठाकरेंवर मानसिक परिणाम झाला आहे. ते स्वतः जरी जागेवर असले तरी त्यांचा स्वतःवर ताबा राहिलेला नाही,” अशी बोचरी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली आहे.

तुमचे मनसुबे पूर्ण होतील, निश्चित रहा !
सर्वांना सोबत घेऊन जाऊ असे विधान करतानाच फडणवीसांनी भाजपा कार्यकर्त्यांना विधानसभेचे मिशन १५२ पूर्ण करण्याबाबतही संकेत दिले आहेत. येत्या काळात आपण सर्वांना सोबत घेऊ. मात्र, बावनकुळेजी हे सगळं करत असताना तुमचे मनसुबे कुठेही अपूर्ण राहणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही फडणवीसांनी बावनकुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना दिले आहे.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *