Breaking News

देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर अजित पवारांची स्पष्टोक्ती, मी माझ्या मतावर ठाम पहाटेच्या शपथविधीबाबत मला वाटेल तेव्हाच मी सांगणार

तीन वर्षापूर्वी एकाबाजूला महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी औट घटकेचे सरकार स्थापन केले. त्यासाठी पहाटेचा शपथविधी उरकण्यात आला. या शपथविधीप्रकरणावरून आतापर्यंत ४ पुस्तके निघाली. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीप्रकरणावरून शरद पवार यांचे थेट नाव घेत एकच खळबळ उडवून दिली. तसेच या घटनेचा पुरूच्चार करत योग्य वेळ आल्यानंतर पुन्हा एकदा उर्वरित सगळं सांगेन असे जाहिर केले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी माझ्या मतावर अद्यापही ठाम असल्याचे सांगत आपण याबाबत भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्यास अजित पवार यांनी नकार देत म्हणाले, मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार, असेही स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीवर भाष्य केले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *