Breaking News

देवेंद्र फडणवीसांनी “गोवा-नागपूर” एक्सप्रेस वे ची घोषणा करत “या” चार जणांचे केले कौतुक बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन प्रसंगी केले कौतुक

बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून १० किमी अंतरावर असलेल्या पहिल्या टोल नाक्यावरील वायफळ येथे झाले. त्यानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोरच पुढील वेळी नागपूर-गोवा एक्सप्रेस वे चा असाच महामार्ग तयार करण्यात येणार असून हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार असल्याचे सांगत समृध्दी महामार्गाचे काम पूर्णत:वास नेणाऱ्या चार अधिकाऱ्यांचे नाव घेत त्यांचे कौतुकही केले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मला जाणूनबुजून काही लोकांचा उल्लेख करायचा आहे, समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी आमचे राधेश्याम मोपलवार, मनोज सौनिक, प्रविण परदेशी, गायकवाड यांचं मोलाचा वाटा होता. ज्यांच्या नावाचा उल्लेख मी करू शकलो नाही त्याची मी माफी मागतो. मात्र, या टीमने जे काम केलं ते खूप जबरदस्त आहे. त्यांच्या कामामुळेच हा महामार्ग होऊ शकला असे सांगत कौतुक केले.

यावेळी ते बोलताना फडणवीस म्हणाले, पुढील टप्प्यात नागपूरहून गोव्यापर्यंत अशाच प्रकारचा महामार्ग तयार करण्यात येईल. हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला एकत्रित करेल. त्याचाही आराखडा आम्ही तयार केला असल्याचेही सांगितले.

मला मोदींचे विशेष आभार मानायचे आहेत, कारण आपला कामाचा वेग लोकांना लक्षात आला पाहिजे. आज मेट्रो फेज टू आणि नाग नदीच्या संवर्धन असे दोन प्रकल्प होत आहेत. आमच्या मागच्या सरकारमध्ये आम्ही या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले होते. मोदींनी ते प्रस्ताव फास्टट्रॅकवर ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी आल्या. मध्यंतरी सरकार बदललं आणि अडीच वर्षात या त्रुटींवर मागील सरकारने उत्तरही दिलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्रुटींची पुर्तता केली आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयात गेलो. मी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली आणि त्यांनी केवळ ३५ दिवसात या दोन्ही प्रकल्पांची प्रक्रिया पूर्ण करून कॅबिनेटची मान्यता दिली. आज त्याचं भूमिपूजन होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे मोदी सरकार आहे, ही मोदी सरकारची गती आहे आणि हे डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार झालं नसतं तर पुढील काही वर्षे या त्रुटी तशाच राहिल्या असत्या आणि हे कार्यक्रमही झाले नसते, असा टोलाही त्यांनी विरोधकांचे नाव घेता फडणवीसांनी लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *