Breaking News

धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला, ‘एकनाथ’च रहावे ‘ऐकनाथ’ होऊ नये थेट निवडणूकीतून नगराध्यक्ष निवडीवरून साधला निशाणा

विधानसभेतील पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगलं असून आज नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत, यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

विधेयकावर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे मागील सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा, असा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळात मांडून मंजूर केला होता. मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला आहे, हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

त्यानंतर मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना म्हणाले, एवढे जास्त सदस्य असून देखील आपल्याला उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती देखील जनतेतून झाली पाहिजे, अशी मागणी केली.

तुमच्या मनातील दु:ख काय आहे? बाकी कुणीही ओळखू शकत नसलं तरी मी ओळखतो. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून भाजपाने काय मिळवलं? तेच मला कळतंच नाही. यापूर्वी ते कमीत कमी ‘विरोधी पक्षनेते’ या संविधानिक पदावर होते. आता ते उपमुख्यमंत्रीपदावर आहेत, पण हे पद संविधानिक नाही अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री पद असंविधानिक असल्याचा उल्लेख करत असताना धनंजय मुंडे यांनी बाजुला बसलेल्या अजित पवारांची माफीदेखील मागितली आहे. “माफ करा दादा” म्हणत धनंजय मुंडे फडणवीसांना उद्देशून पुढे म्हणाले की,१२० सदस्य असूनदेखील तुम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं. याचं दु:ख तुमच्यापेक्षा अधिक आम्हाला होतं. आता तुम्ही सत्ता मिळवली, पण उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागतंय. त्यामुळे नगराध्यक्ष जनतेतून निवडला जावा, असं तुम्हाला वाटत असेल तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून निवडला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *