Breaking News

ठाकरे गटाच्या भाकितावर आता शिंदे गटाच्या आमदारानेही केले मोठे वक्तव्य उध्दव ठाकरे गटातील सर्व आमदार शिंदे गटात येणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार लथवून टाकले. त्यानंतर ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडण्यात जात नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जाणार असल्याचे भाकित करत शिंदे गटातील अनेक आमदार ठाकरे गटात प्रवेश करतील असे भाकित केले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही आज मोठे वक्तव्य करत ठाकरे गटातील सर्व आमदार शिंदे गटात येणार असल्याचे भाकित केले.

आत्तापर्यंत शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार एकनाथ शिंदेसह सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्याशिवाय इतर १० आमदारही त्यांच्यासह गेले आहेत.

यावेळी संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले, जेव्हा शिदेंचा उठाव झाला, तेव्हा गुवाहाटीहून मी प्रतिक्रिया दिली होती की उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना आज संपतीये. तेच प्रकार आज चालू आहेत. काय चालू आहे, कोण बोलतंय, कुणाबद्दल बोलतंय. पक्षाचं कुणाला देणं-घेणं आहे की नाही. स्वत:ची टिमकी वाजवण्यासाठी पक्षाचा वापर आजही चालू आहे. हे लोक कोण आहेत. ग्राऊंड लेव्हलला यांनी काम केलंय का? ग्राऊंड लेव्हलची निवडणूक कशी लढतात हे यांना माहिती आहे का? असा खोचक सवाल करत संजय राऊत यांच्यावर टीका केली.

त्यांच्या पक्षातल्या उरल्या-सुरल्या आमदारांना विचारा तर खरं की ग्राऊंड लेव्हलला आपली काय परिस्थिती आहे. पण आपण कसं लाईमलाईटमध्ये येऊ, या पद्धतीने यांचं सगळं चाललंय. हे पक्षासाठी घातक आहे. पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. तरी उद्धव ठाकरे का गप्प आहेत, हे मला माहिती नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ठाकरे गटातील उरलेले आमदारही शिंदे गटात येतील, असा दावा शिरसाट यांनी करत हा जो सकाळचा साडेनऊचा भोंगा चालतो, त्याला लोकही कंटाळले आहेत. आम्ही ग्राऊंड लेव्हलला काम करतो. पक्षातल्या ज्या आमदार, कार्यकर्त्यांना पुढे निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांना माहिती आहे, की जर असेच बोंबलत बसले, तर ते निवडणूक लढवायच्याही मनस्थितीत राहणार नाहीत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

आजच्या घडीला त्यांच्या पक्षातले उरले-सुरले आमदार म्हणत आहेत की आम्हाला आता पक्षात राहायचं नाही. पण आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. इतक्या लवकर नको. हळूहळू सर्वांना घेऊ. सर्वजण आले, तर त्यांना बिचाऱ्यांना बोंबलायला जागा पाहिजे ना. या आठ-दहा दिवसांत हे होईल, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *