Breaking News

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून तर्क-वितर्काला उधान

अंधेरी विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच निवड प्रक्रिया जाहिर केली. त्यातच शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांना सोबत घेत वेगळी चुल मांडली. त्यातच रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. मात्र त्यात त्यांना अद्याप तरी यश आल्याचे दिसून येत नसल्याने शिंदे गटाकडून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार आहे. दरम्यान ऋतुजा लटके यांनी आपल्या शासकिय सेवेतील राजीनामा दिला आहे. मात्र तो मंजूर न करण्यासाठी शिंदे गटाकडून दबाव आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आमच्यासाठी जर भाजपा मुख्यंमत्री पद सोडत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही एक जागा सोडू शकत नाही का असा सवाल करत ती भाजपाची जागा असल्याने अंधेरी पोट निवडणूकीत भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार असल्याचे जाहिर केले. तसेच भाजपाकडूनही या निवडणूकीसाठी मुरजी पटेल यांचे नाव अंतिम करण्यात आल्याची घोषणा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहिर केले.

मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी अंधेरी विधानसभेची जागा भाजपाला देण्याऐवजी ती आपणच लढवावी असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या गटात घेवून त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह धरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके या आपल्या गटात येत असतील तर त्यांचा नोकरीचा राजीनामा लगेच मंजूर करायचा नाही तर त्यांच्या नोकरीचा राजीनामा लवकर मंजूर न करता उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित कशा राहतील या दृष्टीकोनातून प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यासंदर्भात मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु आहे.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *