Breaking News

नाना पटोले यांची खोचक टीका, नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस…. भाजपाला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला आणा तुम्हाला न्याय देऊ

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि अदानीचा काळा पैसा मात्र पांढरा झाला. मोदी व भाजपा सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

जनसंवाद यात्रेच्या ९ व्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पोहचली. तिरोडा येथील सभेत नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी जे बोलतात नेमके त्याच्या उलटे करतात, शेतीचा खर्च कमी करून शेतमालाला दुप्पट भाव देतो असे म्हणाले होते पण प्रत्यक्षात शेतीचा खर्च प्रचंड वाढवला व शेतमालाचा भाव मात्र कमी केला. पेट्रोल, डिझेलवर शेतकऱ्यांच्या नावाने ४ रुपये कृषी कर घेतात आणि या कराच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये मोदी सरकार लुटते. वर्षभरात एका शेतकऱ्याकडून जवळपास १ लाख रुपये या कराच्या रुपाने लुटतात आणि शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली फक्त ६ हजार रुपये देतात. आपलेच पैसे आपल्यालाच देऊन मोदी व भाजपा पाठ थोपटून घेतात.

लोकशाहीमध्ये लोकांचे ऐकायचे असते पण आता ‘मी’ आहे, जेथे ‘मी’पणा येतो तेथे ‘आम्ही’ संपते. म्हणूनच आता ‘मन की बात’ होत आहे. देशात फक्त ‘मन की बात’ सुरु आहे, मोदी सरकार जनतेला विचारत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व लोकशाही संपवण्याचे काम रोज सुरु आहे, शेतकरी रोज मरतो आहे, तरुणांना रोजगार नाही, महागाईबद्दल सरकार बोलत नाही. निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत, ओबीसी व मागास समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. तलाठी भरतीतून तरुणांना कोट्यवधी रुपयांना सरकारने लुटले. देशातील व राज्यातील भाजपाचे हे सरकार जनतेच्या मुद्द्यावर लक्षच देत नाही. म्हणून जनतेच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहेत. ही लढाई आपण एकत्र मिळून लढू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी काँग्रेस लढत आहे. केंद्रातील व राज्यातील अन्यायी, अत्याचारी भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा व काँग्रेसला सत्तेत आणा, तुम्हाला न्याय देण्याचे काम करेन, असा विश्वास पटोले यांनी दिला.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली अहमदनगर शहरात झालेल्या जनसंवाद यात्रेने गर्दीचा उच्चांक मोडला. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून निघालेल्या पदयात्रेने, नगर शहरातील नागरिकांना नवी आशा दाखवली. कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या जनसंवाद यात्रेने अहमदनगर शहराच्या राजकारण आणि समाजकारणाचा मूड बदलवला. ठिकठिकाणी मराठी संस्कृतीचे दर्शन, पारंपरिक वाद्यांनी स्वागत आणि जनतेचे प्रचंड प्रेम दिसले.

माजी मंत्री व विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात जनसंवाद यात्रा काढली. हेर्ले फाटा येथून निघालेल्या जनसंवाद पदयात्रेचे स्थानिक नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी पदयात्रेत सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या समस्या आणि तक्रारी मांडल्या. हातकणंगले, नेहरू चौक बाजारपेठ येथे सभेला नागरिकांची मोठी गर्दी केली होती. जनसंवाद पदयात्रा ५ दिवसांत ८५ किलोमीटरहून अधिक अंतर कापून कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुके आणि ५ मतदार संघात यशस्वीपणे पोहोचली आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली आज चौथ्या दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *