Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे का ? शेतकरी आत्महत्येवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तर तब्बल ४४ दिवस ओढ दिली. परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे, याची साधी जाणीवही नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा गंभीर इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.

शेतकरी आत्महत्येसंदर्भात सरकारवर निशाणा साधत विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री राज्याला आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करतात, तर दुसरीकडे कृषी मंत्री लाभलेल्या मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्येने उच्चांक गाठला आहे. मराठवाड्यात गेल्या एक महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपवली आहे. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १८६ तर उस्मानाबादमध्ये ११३ आत्महत्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ९५ शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवन संपवले आहे. नांदेडमध्ये ११, परभणीत ५८, तर लातूर जिल्ह्यामध्ये ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे राज्यात सरकार अस्तित्वात आहे का, असा प्रश्न पडतो असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी करत पुढे म्हणाले, राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने मराठावाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. संपूर्ण मराठवाडा आज दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र सुस्त त्रांगडं सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका केली.

कृषी मंत्री उत्तर सभा घेण्यात व्यस्त

शेतकरी आत्महत्येवरून धनंजय मुंडे यांचं नाव न घेता वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. कृषिमंत्र्याच्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक १८६ शेतकऱयांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मात्र कृषी मंत्री सध्या उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहे. अशी टिका करत महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरु आहे त्यात लोकांना बिलकूल रस नाही. लोकांची कामं होणे गरजेचे आहे. असे वडेट्टीवार म्हणाले.

सरकारकडून जातीय विष पेरण्याचे काम

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करीत नाही, मात्र उद्योगपतींचे कोटयावधी रुपयांचे कर्जमाफ केले जाते. केवळ धर्मांध करून जातीय विष पेरण्याचे काम सरकार करीत आहे. राज्यामध्ये विविध जिल्ह्यांत दंगली घडत आहेत. राज्यात गुन्हेगारीतदेखील मोठी वाढ झाली. राज्य सरकार केवळ आमदारांना पोसण्याचे काम करीत असून सरकारी तिजोरी राजरोसपणे लुटली जात आहे. विकासाच्या नावावर मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *