ऑगस्टमध्ये निर्देशांकात घसरण होऊनही डिमॅट खाती उघडणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. डिमॅट खाती उघडण्याचा १९ महिन्यातील हा उच्चांक आहे.
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये ३१ लाख डिमॅट खाती उघडण्यात आली. जानेवारी २०२२ पासून खाते उघडण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. तर महिनाभरापूर्वी २९.७ लाख नवीन खाती उघडण्यात आली आणि वर्षभरापूर्वी २१ लाख नवीन खाती उघडण्यात आली. देशातील डिमॅट खात्यांची एकूण संख्या आता १२.६६ कोटीवर गेली आहे. हा आकडा एका महिन्यापूर्वीच्या संख्येपेक्षा २.५१ टक्के आणि वर्षभरापूर्वीच्या २५.८३ टक्के अधिक आहे.
मार्च २०२० मध्ये एकूण डिमॅट खात्यांची संख्या ४ कोटींपेक्षा कमी होती. मात्र त्यानंतर भारतीय शेअर बाजारातील वाढीनंतर किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ३ वर्षांत डिमॅट खात्यांची संख्या ३ पटीने वाढली आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टी ऑगस्टमध्ये सुमारे २.५ टक्क्यांनी घसरले. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे २.६ टक्के आणि ६.१ टक्के वाढले आहेत. निर्देशांकांची कामगिरी स्थिर असूनही गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांनी घसरलेल्या शेअर्सवर लक्ष केंद्रित केले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये व्यवहाराचे प्रमाण अधिक दिसून आले. दोन्ही निर्देशांकांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
विश्लेषकांच्या मते, फायनान्स मार्केटमधील वाढता आशावाद आणि आत्मविश्वास तसेच इक्विटींबद्दल अधिक जागरूकता यामुळे डिमॅट खात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही विश्लेषकांनी सांगितले की, आयपीओंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या आयपीओंनी सरासरी ३५ ते ४० टक्के परतावा दिला. शिवाय, म्युच्युअल फंडांनी निर्देशांकापेक्षा जास्त कामगिरी केली आहे. पारंपारिक बचत योजनांच्या तुलनेत याने जास्त परतावा दिला. त्यामुळे शेअर बाजाराकडे लोकांचा कल वाढला होता. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये दरमहा १५,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहेत. एसआयपी गुंतवणूकदारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.