Breaking News

जयंत पाटील यांचा विश्वास,… तर शेतकरी शेतात मोती पिकवतील कोविडच्या भयंकर परिस्थितीत निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे समाधान

कोविडची भयंकर परिस्थिती असताना देखील आम्ही न थांबता निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे आज समाधान वाटत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली.

सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर येथे आले असता ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ करण्यात आला ही आनंदाची बाब आहे असेही सांगितले.

जयंत पाटील सांगितले, १९७० ते २०१९ पर्यंत या धरणाच्या कामासाठी ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत जवळपास ९०० कोटींचा निधी देऊन या धरणाचे ९० टक्के काम पूर्ण केले. स्वतः जलसंपदा मंत्री म्हणून धरणाच्या कामाला ३ वेळा भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, पाण्याच्या मदतीने नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी शेतात मोती पिकवून या भागाचा कायापालट करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात मोठ्याप्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. गृहपक्षांना राजीनामा देऊन मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. यावरून पत्रकारांनी आज जयंत पाटलांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी दिली. आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. त्यांनी आताच अर्धातासापूर्वी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितलं की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या म्हटलं, असं म्हणत जयंत पाटील मिश्किल हसले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपामध्ये गेले असल्याने पक्षातील निष्ठावंत अशा भाजपा सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
भाजपाचा अंतर्गत प्रश्न असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले आणि आता शिंदे गटातील लोक नव्याने कधी भाजपावासी होतील हे सांगता येणार नाही. या सर्वांच्या ओझ्याखाली निष्ठावंत कार्यकर्ते मागे ढकलले गेले आहेत. भारतीय जनता पक्षात ती अस्वस्थता मोठी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *