Breaking News

आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, पालिकेत सध्या तीन टी सुरु

मुंबई महापालिकेतील कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकूमशाही सुरु असून अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. पालिकेत सध्या तीन टी सुरु असून ते तीन टी म्हणजे टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु असल्याचा खोचक टोला लगावत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी ५ हजार कोटींची घोषणा केली होती. पण, मर्जीतील लोकांना टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

१ ऑक्टोंबर ते १ जून मध्ये मुंबईतील रस्त्यांची काम केली जातात. पण आता टेंडर रद्द करण्यात आल्याने, नवे टेंडर कधी काढले जाणार. रस्त्यांची कामं कधी होणार आणि कोणत्या रस्त्यांची करण्यात येणार. रस्त्यांसाठी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या घोषणेमुळे मागील काम रखडली गेली आहे. येत्या पावसाळ्यात जर मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, तर याला घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालिकेचे प्रशासन जबाबदार राहिल, असा सवालही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, पालिकेत चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या ९० दिवसांत ६ बदल्या करण्यात आल्या. काहींची तर २४ तासांत बदली केली गेली. प्रशासनात इतक्या तडकाफडली बदल्या होत नाही. एवढा गोंधळ का होतोय? कोणाच्या आदेशाने हे सुरु आहे? असा सवाल करत ते पुढे म्हणाले, मुंबईकरांच्या खिशातून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. हे सौंदर्यीकरण नेमकं कसं करण्यात येणार आहे. सौदर्यींकरण म्हणजे केवळ एलईडी लाईट लावणं नव्हे, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

सध्या सुरु असलेल्या सावरकर वादावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मीही सहमत आहे. पण सध्याच्या स्थितीसाठीही राष्ट्रीय पक्षांनी भांडायला पाहिजे. आपण सगळे ५० वर्षांपूर्वी किंवा १०० वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं, यावर भांडायला लागलो, तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आत्ताच्या स्थितीसाठी कोण भांडणार? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे पोलिस ठाण्याच्या आवारातच धरणे आंदोलन

लोकसभा निवडणूकीसाठी ४ थ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उद्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *