Breaking News

शिवसेना उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची राज्यसभेतील जागा कमी होणार

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण यांच्यासमोर पुन्हा खासदार म्हणून निवडूण जाण्याचे आव्हान असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार शिवसेना उबाठा गटाचे सर्वश्री अनिल देसाई, प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, भाजपा व्ही. मुरलीधरन, नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ ०२ एप्रिल २०२४ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. यापैकी भाजपाचे प्रकाश जावडेकर यांच्यावर केरळ राज्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने आधीच केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे भाजपाकडूनच अवघड मानले जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांबरोबरच भाजपामधील विद्यमान राज्यसभा खासदारांसमोर पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु येत्या राज्यसभा निवडणूकीत इंडिया आघाडीतील सदस्यांचे संख्याबळ आणखी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्ष वगळता शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना पुन्हा निवडूण जाण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक खासदार कमी होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना उबाठा गटातील सर्व आमदार भाजपासोबत गेल्याने शिवसेना उबाठा गटाने मिळालेल्या अनिल देसाई यांची जागा पुन्हा एकदा निवडूण येण्याची शक्यताही कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडूण जाण्याच्या जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी होऊन भाजपाचे संख्याबळ वाढण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत आहे.

या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (३), बिहार (६), छत्तीसगड (१), गुजरात (४), हरियाणा (१), हिमाचल प्रदेश (१), कर्नाटक (४), मध्य प्रदेश (५), महाराष्ट्र (६), तेलंगणा (३), उत्तर प्रदेश (१०), उत्तराखंड (१), पश्चिम बंगाल (५) ओडिशा (३) आणि राजस्थान (३) या १६ राज्यांमधील ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. १५ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १६ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. २० फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत- जांभळ्या (Violet) रंगाची स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे तसेच, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबतचेही त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *