सध्या देशात लोकसभा निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. त्यानुसार सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच राजस्थानातील एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी विश्वचषक स्पर्धेत भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते, त्याचाच संदर्भ देत थेट भाजपाच्या एका विशिष्ट नेत्याला “पनौती” ची उपाधी दिली.
आतापर्यंतचा राजकिय इतिहास पाहता राजस्थानमधील जनतेने सलग दोनवेळा कधीच एकाच पक्षाकडे सत्ता दिली नाही. मात्र प्रत्येकवेळी आलटून-पालटून कधी भाजपाला तर कधी काँग्रेसला राज्याच्या सत्तेची सुत्रे बहाल केली. त्यातच भाजपाने राज्याच्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचारातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या नेत्या वसुंधरा राजे यांना बाजूला सारले आहे. तसेच काँग्रेसकडून राजस्थानातील जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे. तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी जनतेला आकर्षित करण्यासाठी काही योजनाही निवडणूक पूर्व घोषणाही केल्या.
याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सभा सर्वाधिक होत आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गाधी, मल्लिकार्जून खर्गे, विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जाहिर सभा राजस्थानात आयोजित करण्यात आल्या आहेत.
देशातील जनतेने भाजपाला दोन वेळा सलग कौल दिला आहे. तसेच भाजपा नेत्यांच्या किंवा भाजपावर टीका करण्यांवर केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांकडून चौकशीचा ससेमिरा लावला जातो असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही भाजपाच्या पध्दतीने आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली असून कोणे एकेकाळी राहुल गांधी यांना भाजपाकडून पप्पू अशी उपाधी देत त्यांचा उपाहास केला होता. आज त्याच भाजपाच्या शिर्ष्य नेत्याला राहुल गांधी यांनी भर प्रचारसभेत विश्वचषक स्पर्धेचा संदर्भ देत पनौती अशी उपाधी दिली. यावेळी पहिल्यांदाच राजस्थानच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी भाजपाच्या त्या नेत्यांने केलेल्या टीकेची परतफेड केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. मात्र राहुल गांधी यांनी भाजपाच्या नेत्याचे नाव घेतले नसल्याने भाजपाच्या कोणत्या नेत्याला उद्देशून पनौती अशी उपाधी दिली आणि तो नेता जर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उपस्थित राहिला नसता आपली भारतीय क्रिकेट टीम हरली नसती अशी खोचक टीका केली. यावरूनही याबाबत उत्सुकताही निर्माण झाली आहे.
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023