Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजकिय वारस कोण? नेते प्रफुल पटेल यांचे मोठे विधान.. प्रफुल पटेल यांची स्पष्टोक्ती मी रेस मध्ये नाही

मंगळवारी सकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं. एकीकडे शरद पवार राजीनामा मागे घेणार का? यावर चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा घडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. सुप्रिया सुळेच राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्ष होतील अशी शक्यता व्यक्त होत असताना त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केले.

शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासूनच सुप्रिया सुळेंचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षा म्हणून घेतलं जात आहे. दुसरीकडे अजित पवारांनीही कार्यकर्त्यांना समजावताना नव्या अध्यक्षांच्या पाठिशी आपण सगळे उभे राहू, असं म्हटल्यामुळे ते स्वत: अध्यक्ष होणार नसल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरवर आज शरद पवार दाखल झाले होते. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेतेमंडळीही होती. त्यामुळे आजच नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार असं म्हटलं जात होतं. शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडताच प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आत नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला अध्यक्षपदामध्ये कोणताही रस नसल्याचं म्हटलं आहे. मला अध्यक्ष होण्यात अजिबात रस नाही. माझ्याकडे आधीच खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. मी आधीच पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, असं ते म्हणाले.

वाय बी सेंटरला शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अनेक मान्यवरांची भेट घेतली. आज राष्ट्रवादी पक्षाची बैठक नव्हती. आज ना बैठक झाली ना कोणताही निर्णय झाला. अनेक उलट-सुलट बातम्या टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून येत आहेत. शरद पवारांनी काल घेतलेला निर्णय मागे घेण्याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. त्यांच्या मनात काय आहे, याबाबत त्यांनी अद्याप स्पष्टीकरण केलेलं नाही. उद्या आम्ही पुन्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. जे काही अधिकृत असेल, ते आम्ही तुम्हाला सांगू, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आज सकाळपासूनच सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा चालू आहे. मात्र, हे सर्व तर्क असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळेंबाबतची चर्चा फक्त तर्कांच्या आधारे केली जात आहे. कुणी काही विधान दिलं की त्यावर सगळ्यांनी ब्रेकिंग न्यूज चालवली. हे चुकीचं आहे. पक्षाची अधिकृत व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो की ना पक्षाची कोणती बैठक झालेली आहे ना कोणता निर्णय झालेला आहे. बैठक होईल, तेव्हा मीच तु्म्हाला सांगेन, असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *