Breaking News

भाजपा म्हणते, नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाडांना पक्षातून निलंबित करा

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी भाजपार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुणे येथे केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे पुणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा आणि त्यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचा दिलेला इशारा याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी हाताने धरून एका महिलेला बाजूला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता उरली असेल तर त्यांनी आजच आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी नुकताच एका नेत्याने अपशब्द उच्चारला. भारतीय जनता पार्टी त्याचे कधीही समर्थन करणार नाही. पण त्यावेळी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओत दिसत असूनही समर्थन करतात. हा त्या पक्षाचा दुटप्पीपणा आहे.

त्यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य जितके चूक आहे तितकेच त्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करणेही चूक आहे. शहरात असे होत राहते, असे ज्यांनी म्हटले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. मा. देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत. ते गृहमंत्री असताना राज्यात दादागिरी चालू देणार नाही. भाजपा हे सहन करणार नाही.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *