Breaking News

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात तर धास्तावलेले मुख्यमंत्री शिंदे निघाले मुंबईकडे

राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटे पर्यंतच मनोज जरांगे पाटील यांना थोपवून धरण्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुत्सुद्यांना यश येत होते. परंतु आता काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचेच या उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानाला आपल्या आंदोलनाचे केंद्रस्थान बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेत मुंबईच्या अगदी जवळपास पोहोचल्यानंतर आता खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारनने आता मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच गतवेळेप्रमाणे यावेळीही शिष्टाई यशस्वी व्हावी या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने आपल्या दरे या गावातून मुंबईकडे हेलिकॉप्टरद्वारे येण्याची लगबग सुरु केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

साधारणतः सहा महिन्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाची सुरुवातीला दखल न घेणाऱ्या राज्य सरकारने मात्र काही कालावधीनंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेण्यास राज्य सरकारकडून सुरुवात झाली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात सातत्याने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांवर मात्र राज्य सरकारकडून ठोस आश्वासन दिले गेले नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा शेवटचे आंदोलन म्हणून मुंबईकडे प्रयाण केले.

विशेष म्हणजे २० जानेवारी २०२४ रोजी मुंबईकडे निघणार अशी घोषणा मनोजर जरांगे पाटील यांनी केलेली असतानाही राज्य सरकारन मराठा समाजाच्या मोर्चाला मुंबईच्या बाहेरच थांबविण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्याऐवजी राज्य सरकारकडून बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्यावर त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सोपविली. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी मळलेल्या वाटेने जाण्याऐवजी स्वतंत्र वाटेने जाण्याचा निर्णय घेत मुंबईचा रस्ता धरला.

दरम्यान, मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो कार्यकर्त्ये जर मुंबईत दाखल झाले तर मुंबईतील व्यवस्थेची त्रेधा तिरपिट उडण्याची शक्यता निर्माण झाली. या सगळ्या घडामोडींवर मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील नागरिकांचा हक्क अबाधित ठेवत शाहिन बाग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

परंतु इतके होऊनही राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस आश्वासन किंवा अंतिम निर्णय न घेता स्थानिक प्रशासनावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकांना रोखण्याची जबाबदारी सोपविली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी आता हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी आता राज्य सरकारकडून पोलिसी यंत्रणांचा वापर सुरु करण्यास सुरुवात केल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. तर दुसऱ्याबाजूला मनोज जरांगे पाटील यांनी काहीही करून मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यानेच लोणावळ्यात प्रसारमाध्यांशी बोलताना सांगितले.

या सगळ्या घडामोंडीत परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये यासाठी सातारा जिल्ह्यातील तापोळा येथील दरे या गावी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत परतण्याच्यादृष्टीने लगबग सुरु असल्याचे सांगितले. वास्तविक पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नियोजित वेळेनुसार रात्री उशीरा २६ जानेवारी २०२४ रोजी परतणार होते. परंतु तत्पूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकांचा ताफा मुंबईत धडकणार असल्याने अखेर आंदोलकांबरोबरील चर्चेसाठी मुख्यमंत्री रात्री उशीराच्या ऐवजी लवकर मुंबईत पोहचून आंदोलकांशी चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, गुजरातला परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?

कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *