Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल… उदयनिधी स्टॅलिनची मते उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ?

सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणा-या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा वारंवार करत आहेत. या विचारावरच जी इंडी आघाडी तयार झाली त्या आघाडीत हिंदू ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे सामील आहेत. उदयनिधींची सनातन हिंदू धर्माबद्दलची मते तुम्हाला मान्य आहेत का हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे असे आव्हानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशिष देशमुख, नव्याने पक्ष प्रवेश केलेले जळगावचे कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी विचारांना मूठमाती दिली, घराणेशाही नुसार मुख्यमंत्री असताना स्वत:च्या मुलाला मंत्री केले त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर, भाजपावर टीका करण्याचा अधिकारच नाही. उद्धव ठाकरे यांच्या हातातून सत्ता, पक्ष,कार्यकर्ते सगळेच निसटले. उद्धव यांच्या नाकर्तेपणामुळे पक्षाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. म्हणूनच अस्वस्थ, विचलित मानसिक अवस्थेत उद्धव यांनी नाशिक इथे मोदीजी आणि भाजपा विरोधात गरळ ओकली अशी टीकाही केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, इंडी आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पवित्र्यामुळे फूट पडल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात एकीकडे इंडी आघाडीची शकले होताना दिसतील तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपा मध्ये पक्षप्रवेशाचा झंझावात दिसून येईल, असेही सांगितले.
यावेळी जळगावचे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील, धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह काँग्रेस, शिवेसना उबाठा गटातील अनेक सरपंच, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, आ. मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, रावेर ग्रामीण अध्यक्ष अमोल जावळे आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मोदी सरकारने भारताचे नाव जगात उंचावले आहे. भारताला क्रमांक एकचा देश बनविण्याचा संकल्प केला आहे. अशा नेत्यांच्या हाताखाली काम करायला मिळणे हे सर्व कार्यकर्त्यांचे भाग्य आहे. राज्यातील महायुतीचे सरकारही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळेच डॉ. उल्हास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ, जाणत्या काँग्रेस नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नोटीसांना प्रतिसाद नाहीः ईडीची अरविंद केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात धाव

मागील काही महिन्यांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सातत्याने ईडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *