Breaking News

पिंपरी-चिंचवडच्या जागेवर शिवसेनेचा दावा मात्र अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता

नुकत्याच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाचा दोन ठिकाणी महाविकास आघाडीने पराभव केला. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर असून या दोन्ही जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही आग्रही भूमिका घेतली असून त्यांनी या जागेसाठी इच्छुक असलेल्या १० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

गुरुवारी पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे सुभाष देसाई हे यावेळी उपस्थित होते. मात्र त्याच वेळी पुण्यात बारामती हॉस्टेल येथे अजित पवार यांच्या अध्यतेखाली बैठक पार पडली. बैठकी अगोदर इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या. महाविकास आघाडी म्हणून देखील निवडणूक लढवण्याची तयारी अजित पवार यांनी दर्शवली असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, लहान बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणले आहेत. परंतु, भाजपाकडून एबी फॉर्म कोणाला मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. तर, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेस ने निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. गुरुवारी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूकी संदर्भात राष्ट्रवादीची बैठक पार पडली.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे इच्छुक दहा उमेदवार अजित पवार यांना वैयक्तिक भेटले. त्यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केली. मग, सर्व पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत राष्ट्रवादी चिंचवड पोटनिवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच, कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा तसा आग्रह देखील आहे. महाविकास आघाडी जो निर्णय होईल त्याबाबत नरमाईची भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकी संदर्भात महाविकास आघाडी बाबत राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होणार आहे. २०१९ च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठबळावर निवडणूक लढलेले शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांचा मार्ग मात्र सुकर होणार नसल्याचे सध्या तरी चित्र आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *