Breaking News

संजय राऊत यांची खोचक टीका, मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस मॉरिशसला… दिल्लीतील मोगलांच्या आदेशानुसार बारसूत घडत आहे

नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसूमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू असून, त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. याठिकाणी ४ दिवसांपासून स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे. अशातच आज २८ एप्रिल रोजी आंदोलकांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात, स्थानिकांवर जोर-जबरदस्ती करणार नाही, त्यांच्या भावनांचा विचार करण्यात येईल. दुसरीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात येत आहे. कदाचित त्यांच्यावर गोळ्या झाडत, बारसूची भूमी रक्ताने भिजवत रिफायनरी उभी कराल, असा हल्लाबोल राज्य सरकारवर केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कोकणात सुरु असलेला अमानूष खेळ दिल्लीच्या आदेशाने सुरू आहे. काहीही झालं तरी रिफायनरी सुरू करायची आहे, असं दिल्लीने सांगितलं आहे. कारण, परदेशी कंपन्यांबरोबर दिल्लीवाल्यांनी करार केले असून, मोठ्या प्रमाणात कमिशनबाजी केली आहे. खाजगी लोकांनी बारसूच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा फायदा, तोटा हे गणित लावून बारसू आणि राजापुरातील स्थानिकांवर लाठीहल्ला सुरू झाला आहे. ही लोकशाही नाही, अशी टीकाही केली.

देवेंद्र फडणवीसांच्या मॉरिशस दौऱ्यावरून निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मॉरिशसला गेले आहेत. तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा अधिकार आहे का? शिवरायांच्या कोकणात निरापराध लोकांना तुडवून मारलं जात आहे. महिलांना फरफटत, केस ओढत पोलीस नेत आहेत. शिवसेना हे सहन करणार नाही, असा इशाराही दिला.

ज्या कोकण पट्ट्याने शिवसेना वाढवली, उभी केली आणि टिकवली, त्या जनतेवरील अत्याचार सहन करणार नाही. मॉरिशसला गेलेल्या गृहमंत्र्यांनी जोर-जबरदस्ती करून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. कारण, दिल्लीतील मोगलांचा आदेश आहे. बारसूतील प्रत्येक गोष्ट दिल्लीत पाहिली जाते, असेही संजय राऊत म्हणाले.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *