राज्यात महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपाकडून तीन चाकांची रिक्षा अशी टीका केली जात असे. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन चाकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ही आता सहभागी झाल्यानंतर गडचिरोली येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे आमचे त्रिशुळ असल्याचे जाहिर केले. तोच धागा पकडत शिवसेना (ठाकरे गट) चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्री फुल आहेत की हाफ आहेत हे मला माहित नाही. आताचे सरकार हे दोन फुल एक हाफ असल्याची टीका करत आमचे महाविकास आघाडीचे सरकार ते तीन चाकांचे होते तर तुमचे त्रिशुळ कसे असेल असा सवालही देवेंद्र फडणवीस यांना केला.
शिवसेना (ठाकरे गट) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून केली. यावेळी दिग्रस येथील जाहिर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर यांनी मेहनत करून भाजपा वाढवला. पण, आता बाजरबुणगे येत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनी माखलेल्यांना भाजपात घेतलं जात आहे. त्यांच्या सतरंज्या घालण्याचं काम भाजपाचे निष्ठावंत अंधभक्त करत आहेत, असा हल्लाबोलही केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी एकटा आहे, असं भाजपाला वाटतं. पण, कार्यकर्त्यांच्या मनातून बाळासाहेब ठाकरे काढू शकणार नाही. राजकारणात फोडाफोडी होत असते. छगन भुजबळ आपल्यात होते, नंतर राष्ट्रवादीत गेले. आता तिकडे गेले आहेत. पण, पक्ष संपवून टाकण्याची वृत्ती आली आहे. ती वृत्ती संपवण्याची गरज आहे, असे सांगत विरोधकांनी जाहीर सभेत आमच्यावर बोलवं, आम्ही तुमच्यावर बोलतो. जनता ठरवेल ते मान्य करायचं, याला म्हणतात लोकशाही. मात्र, आता तुम्ही मत कोणालाही द्या सरकार माझेच येणार, असं चाललं आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं. आता खोक्यातून सरकार जन्माला येत आहे, अशी टीका केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, महाराष्ट्रात मी नेतृत्व करायचं की नाही हे राज्यातील जनतेनं सांगावं मात्र अमित शाह-मोदी यांनी आम्हाला सांगू नये अशी खोचक टीका करत सध्या हुकूमशाही पध्दतीने भाजपाकडून कारभार केला जात आहे. प्रत्येक लोकशाहीतील संस्था मोडण्याचे काम सुरु आहे. या हुकूमशाही वृत्तीला आपल्याला फेकून द्यायचे आहे. हे मी माझ्यासाठी सांगत नाही तर आपणा सगळ्यांसाठी सांगत असून आपणा सर्वांना त्यासाठी लढावं लागणार असल्याचेही आवाहन केले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्याकडचे सगळे आमदार खासदार गेले तरी चालतील मात्र माझ्यासोबत काम करणारा शिवसैनिक हा निष्ठावान असला पाहिजे. यावेळी नुसते आरोप झाले तर इथल्या खासदारताई तर कुठच्या कुठ पळाल्या. तर काही जण इकडून गेले अशी टीका करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या राज्यात लाचारांचे राजकारण करण्याचे काम सुरु आहे मात्र लाचारांचा महाराष्ट्र मी कदापीही होऊ देणार नाही असा इशाराही भाजपाला दिला.
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद । दिग्रस, यवतमाळ – #LIVE #UddhavSahebThackeray #विदर्भदौरा [ रविवार – ०९ जुलै २०२३ ] https://t.co/OhPwukYhuQ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 9, 2023