Breaking News

राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, ते वक्तव्य त्यांचं.. त्याशी आम्ही सहमत नाही

मुंबई आणि ठाणे येथील गुजराती आणि राजस्थानी बाबत मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या दर्जाबाबतही वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करत एकच खळबळ उडवून दिली. त्याचे पडसादही राज्याच्या राजकिय वर्तुळात पडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारच मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मालेगांवच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच असं वक्तव्य करण्याचा कुणालाही अधिकार नाही. शिवसेना म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही. आम्हाला ते मान्य नाही. राज्यपालांनी त्यांचा अवमान करण्याचा कोणातही विचार नव्हता असा खुलासा केला आहे. मराठी माणूस आणि मुंबई सर्वोच्च आहे असं त्यांनीच सांगितलं आहे. शिवसेनेची भूमिका मला सांगण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे यांची जी परखड भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे असेही त्यांनी सांगितले.

राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला असल्याचे ते म्हणाले.

तर राज्यपालांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खुलासा करत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यपाल हे एक मोठं पद आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे म्हणाले, आमची स्पष्ट भूमिका आहे की मराठी माणसाचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. या मुंबईत इतर राज्यातील लोकही रोजगार करतात. इतर समाजाचे लोकही व्यवसाय, व्यापार करतात. परंतु, मुंबईत जे काही सामर्थ्य आहे, महत्त्व आहे त्यामुळेच हे होतं. याचं श्रेय इतर कुणालाही घेता येणार नाही. मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेचा कुणालाही अवमान करता येणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून मराठी माणसाच्या मागे आहोत, असंही नमूद केलं.

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांनी मराठी माणसाला न्यायहक्क मिळवून देण्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे मुंबईवर अनेक प्रसंग आले, मुंबईने अनेक संकटं पाहिली. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम मुंबईच्या पाठिशी उभे राहिले. कितीही संकटं आले तरी मुंबई थांबत नाही. मुंबई २४ तास सुरू असते. मुंबई कोट्यावधी लोकांना रोजगार देते. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मुंबईच्या माध्यमातून सुटत असतो असेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *