Breaking News

एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीने भावविवश होत सांगितली बंडा मागील ‘ही’ कारणे उध्दव ठाकरे यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळत संजय राऊत, आदित्य ठाकरेंवर निशाणा

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने आज एका सर्वसामान्य सैनिकासारखे बोलत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाची भूमिका का घेतली याची कारणे सांगत विधानसभेला पहिल्यांदाच भरपूर हसविले. मात्र आपल्या मुलांच्या दुर्दैवी अंतावरून भावविवश झाल्याचे चित्र सभागृहाला पाह्यला मिळाल्याने एकनाथ शिंदे नामक नवे व्यक्तीमत्व आज दिसून आले.

आपला राजकीय प्रवास कसा झाला याबद्दल बोलताना आपल्या दिवंगत मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला. भावनिक झालेले एकनाथ शिंदे काही क्षण थांबले आणि पाणी प्यायल्यानंतर पुन्हा बोलू लागले.

आमचे बाप कढले गेले, स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचा सैनिक माझ्यासोबत होते. मला अभिमान आहे या ५० लोकांचा आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मी विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी निघालो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आठवलं की, अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार मला असं म्हणाला नाही की आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊ यात. हा विश्वास आहे, सुनील प्रभुला माहितीय कशाप्रकारे माझं खच्चीकरण झालं असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. पण मागे हटणार नाही, ही छोटी मोठी घटना नाहीय. जे ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढं मोठं का झालं, काय घडलं, कशासाठी झालं?.

बाप काढला. माझे वडील अजून जिवंत आहेत. आई वारली. माझी आई गावी होती. एकदा उद्धवसाहेबांशी बोलणं झालं होतं तेव्हा तिने सांगितलं होतं की माझ्या बाळाची काळजी घ्या. त्यावेळी उद्धव यांनी एवढा मोठा होऊनही ती तुला बाळ म्हणते, असं म्हटल्याचं सांगितले. मी जेव्हा घरी यायचो तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे आणि सकाळी उठायचो तेव्हा ते कामावर गेलेले असायचे. महिन्यात कधी तरी १५-२० दिवस भेटही व्हायची नाही. एक बाप म्हणून मला श्रीकांतलाही वेळ देता आला नाही, इतका सारा वेळ मी शिवसेनेसाठी दिला. श्रीकांत जेव्हा डॉक्टर झाला तेव्हा ही मी त्याला भेटू शकलो नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या दोन्ही दिवंगत मुलांबद्दल बोलताना, माझी दोन्ही मुलं गेली तेव्हा दिघेसाहेबांनी मला आधार दिल्याचे सांगत असताना शिंदे यांचा कंठ दाटून आला. आवाज जड झाला. ते काही वेळ थांबले आणि त्यानंतर पाणी पिऊन पुन्हा बोलू लागले.

२००० साली शिंदे यांच्या लहान मुलाचा आणि मुलीचा गावी नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ते पूर्णपणे खचून गेले होते. एकनाथ शिंदेंना दिघेंनी आधार देत त्यांना राजकारणात अधिक सक्रीय भूमिका घेण्यासाठी भाग पाडत या खासगी दु:खातून बाहेर काढलं. तेव्हा ते म्हणाले, तुला दु:ख आवरावेच लागेल. कारण तुला लोकांच्या डोळ्यातील अश्रु पुसायचे आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रु येणार नाहीत त्यासाठी तुला काम करायचंय. आणि तेव्हापासून मी माझा पूर्ण वेळ शिवसेनेसाठी दिल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीसोबत बसल्यानंतर आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आठवले, त्यांनी त्यावेळी वाजपेयींचे सरकार पडल्यानंतर म्हणाले होते की, काँग्रेसबरोबर सत्ता कधीही स्थापन करणार नाही. तशी वेळ आली तर मी माझं दुकानं बंद करेन. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार कोणी काढून घेतला होता. त्यासाठी काँग्रेसनेच तक्रार केली होती अशी आठवण सांगत अशा लोकांसोबत आम्ही सत्तेत कसे बसायचे असा सवाल केला.

त्याचबरोबर निवडणूकीपूर्वी आमचे पक्षप्रमुख उध्दव साहेब म्हणाले की, १५ वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने महाराष्ट्राला सडविले, राज्याला सगळ्याच गोष्टीत खाली आणले मग आता त्यांच्याबरोबर सत्तेत कसे बसणार, हाच प्रश्न माझ्यासह अनेक आमदारांच्या मनात होता. याशिवाय राज्यसभा निवडणूकीत झालेल्या पराभवनानंतर मला विधान परिषदेच्या प्रक्रियेतून बाजूला सारण्यात आले. माझं खच्चीकरण सुरु झाले. त्यावेळी मी बाहेर पडायचा निर्णय घेतला. मतदान झाल्यानंतर मी उध्दव साहेबांना भेटलो आणि सांगितलो मी जातोय तर त्यांनी विचारलं नाही कुठे, कशासाठी, का ? त्यानंतर मी बाहेर पडलो. मलाच माहित नव्हते कुठे जातोय म्हणून पण मी बाहेर पडलो होतो. जाता गद्दारी केली असे वाटायला नको म्हणून दोन्ही उमेदवार निवडूण येण्याची तजवीज आधीच केली होती. त्यानुसार निकाल बाहेर यायला लागल्यानंतर आम्हाला फोन येवू लागले. साहेबांचाही फोन आला. पण आम्ही निघालो होतो. कुठे चाललोय हे माहित नव्हते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *