Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझी पंतप्रधान मोदींशी चर्चा झालीय…चिंता करू नका राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध

‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ मध्ये कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्य शासनाच्या विकासात्मक प्रकल्पांची माहिती देतांना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कला, साहित्य, उद्योग, राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील प्रख्यात व्यक्तींच्या संकल्पनांच्या आदान-प्रदानासाठी ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी हा कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आला आहे.

मुलाखतीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आमचे लोकाभिमुख, विकासाभिमुख’ सरकार असेल. गेल्या तीन महिन्यात जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून जनतेला दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले जात आहेत. राज्य शासन विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. हे जनतेचे सरकार आहे. सण आणि उत्सव आता उत्साहात साजरे केले जात आहेत. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेली राज्याची अर्थव्यवस्था सुधारते आहे. राज्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

औद्योगिक करारांची शंभर टक्के अंमलबजावणी
राज्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असून यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प दिले जातील, चिंता करू नका, असे आश्वासन दिले आहे. औद्योगिक सामंजस्य करारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. नुसते करार करून चालणार नाही. आगामी काळात जे करार होतील त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल. राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकही वाढेल, अशी माहिती देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होईल. हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. महामार्गालगत नवनगर, नोडस, नॉलेज सिटीज उभारण्यात येत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. प्रक्रिया उद्योगही सुरू होईल. शिर्डी पर्यंतचा मार्ग खुला केला जाणार आहे. पुढच्या वर्षात समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू केला जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे ठाणे, रायगड,संभाजीनगर येथे उद्योग आहेत. आता महामार्गाजवळ सुद्धा उद्योग वाढत आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि सर्वच क्षेत्रात समृद्धी येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करणार
यापूर्वी राज्यात मेट्रो, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ची निर्मिती झाली. आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करतोय. या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे मधील प्रवासासाठीचा वेळ २० मिनिटांनी कमी होईल.

दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई
मुंबईत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याचं काम केले जात आहे. निविदा प्रकियेला सुरूवात झाली आहे. सुमारे ५ हजार ५०० कोटी रूपयांचे काँक्रीट रस्ते दोन वर्षात पूर्ण होतील, असे निर्देश देखील मुंबई महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. येत्या काळात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबईच्या विकासात भर घालणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) चे काम प्रगतीपथावर आहे. हा २२ किमीचा देशातील सर्वात लांब सी-लिंक आहे. त्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासह नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी केली जात असून शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. प्रमुख शहरांमध्ये सुमारे ३४० किलोमीटरची मेट्रो उभारण्यात येत असून २०२७ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यंमंत्र्यांनी दिली.

प्रवाशांच्या फायद्यासाठी आरेमध्ये कार शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *