Breaking News

अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले, आज सहा महिने झाले…त्यातून बाहेर पडा तुमच्या त्या गोष्टीशी आम्हाला घेणं-देणं नाही

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रस्तावाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्याना आव्हानही दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या एकूणच भाषणावरून चांगलेच सुनावले. त्यामुळे ज्या जोरदारपणे मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण केले त्यातून हवाच काढून घेतली गेल्याचे चित्र सभागृहात पाह्यला मिळाले.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आज बरोबर तुम्ही मुख्यमंत्री झालात. त्यास सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यात तुम्ही जेव्हा जेव्हा भाषणे केलात. त्यावेळी तुम्ही थोड्याफार फरकाने हेच मुद्दे मांडलात. तुम्ही राज्यातील १३ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, या राज्याचे प्रमुख आहात. त्यामुळे यातून तुम्ही बाहेर पडा असे असा खोचक सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला.

तुम्ही ज्यांच्यापासून आलात. त्याविषयीच्या बातम्या त्या सामना वर्तमान पत्रात छापून येतात. त्या तुम्ही लोकं वाचून त्या मनाला लावून घेता आणि त्यावरच बोलता. त्या गोष्टीशी आम्हाला काहीही देणं नाही. तुमच्या मुलाच्या वयाच्या व्यक्तींच्या वक्तव्याला महत्व देता. त्यापेक्षा तुमच्याकडील नव्या तरूणांना प्रवक्ते पदी नेमा आणि सांगांना त्यांना बोलायला असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

अजित पवार म्हणाले, राज्यातील तरूणांना तुमच्या या गोष्टींशी काही ही देणंघेणे नाही. ही तरूण मुले त्यांना रोजगार कसा मिळेल याकडे बघत असतात. त्यामुळे या तरूणांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष्य द्या. त्यांना रोजगार मिळाला तर राज्यासमोरील एक मोठे संकट टळेल अशा स्पष्ट शब्दातच सुनावले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही आमच्याकडचीच माणसे घेतलीत. ती कशी शांतपणे उत्तर देतात, चिडचीड करत नाहीत. त्यांच्यावर जबाबदारी सोपवा, त्यांच्याकडून काही तरी शिका असा खरमरीत टोलाही मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

अजित पवारांनी घेतला भाजपा मंत्री आणि आमदारांचा क्लास

आज सकाळपासूनच अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली. सभागृहातील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह कोणताच मंत्री सभागृहात उपस्थित राहिला नसल्याने अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नजरेस आणून देत मंत्री सभागृहात येई पर्यंत कामकाज थाबविण्यास भाग पाडले. त्याचबरोबर प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान वैद्यकीय विभागाशी संबधित प्रश्नाला उत्तर देण्यास मंत्री गिरिष महाजन हे उपस्थित राहीले नाहीत. तसेच त्यांचा प्रश्न राखून ठेवून पुढील अधिवेशनात घेण्याचा निरोप महाजन यांनी दिला होता. त्यावर चिडलेल्या अजित पवार यांनी हे काय चाललंय असा सवाल विधानसभा अध्यक्षांना करत हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा दिला.

तर प्रश्नोत्तराच्या तासावेळी किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या अन्य दोन तीन आमदार सभागृहातच खुशाल वर्तमान पत्र वाचत बसले होते. त्यावरून अजित पवार म्हणाले, संबधित आमदार कोठे तरी रेल्वे स्टेशनवर बसून पेपर वाचत बसल्यासारखे बसले आहेत. त्यांना नेम करा आणि सभागृहात कसे बसतात त्याची शिस्त लावा अशी मागणी केली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *