Breaking News

किरीट सोमय्या म्हणाले, जयंत पाटील यांना काही कळत का? राऊतांना मस्ती आणि गुर्मी पुणे दौऱ्यावर असताना सोमय्यांचा तोल सुटला

मराठी ई-बातम्या टीम

काही दिवसांपूर्वी जम्बो कोविड सेंटर वाटपात घोटाळा झाल्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेत गेलेल्या किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या गराड्यातून सोमय्याांच्या सुरक्षांनी बाहेर काढताना ते पायऱ्यांवर पडले. तर भाजपाकडून पडलेल्या पायरीवरच सोमय्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांनी सदरच्या सत्काराला परवानगी नाकारली आहे. परंतु या सत्कार सोहळ्यासाठी पुणे दौऱ्यावर गेलेल्या किरीट सोमय्या यांचा तोलच चांगलाच ढळला असल्याचे दिसून आले.

पुणे विमानतळावर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केले असून कारवाई झाली पाहिजे. मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा.

गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच, असा इशारा देत सत्काराला महत्व नाही. त्या कंपनीवर कारवाई करावी लागणारच आहे. संजय राऊतांना जाब द्यावा लागणार. संजय राऊत धमकी कोणाला देतात? असा सवाल करत संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही किरीट सोमय्या यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याबाबत सोमय्यांना विचारले असता ते म्हणाले की, जयंत पाटील यांना काही कळते का? की मला मारहाण करण्याचा कट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ठरविला का? असा सवालही त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह १० जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना जामीनदेखील मंजूर झाला. दरम्यान दुपारी ४ वाजता किरीट सोमय्या महापालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या पायरीवर सोमय्या यांना धक्काबुक्की झाली तिथे भाजपाकडून जंगी स्वागत आणि पुष्पहार घालण्यात येणार आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *