Breaking News

रोहित पवार म्हणाले, पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं पण आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन काही काळ भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले. मात्र ते अल्पजीवी ठरले. त्यानंतर भाजपाने शिवसेनेत बंड घडवून आणत बंडखोर शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केले. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष संपतील असे भाकित केले. त्यानंतर भाजपाच्या टार्गेटवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची चर्चाही राजकिय वर्तुळात सुरु झाली होती. यापार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवार कुटुंबातील एक असलेल्या रोहित पवार यांनीही आता पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं असे वक्तव्य केले.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जयंत पाटील यांच्या घरावर लवकरच भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा केला. यापार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.

शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आता भाजपाचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला. शिवसेना एक मोठा पक्ष होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून, राजकारण करून तो पक्ष फोडण्यात आला. पण दुसरं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो हे मी बोललो होतो. कारण शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे, असेही ते म्हणाले.

टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असलं, तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं शक्य नाही. कारण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे चालत आहोत. एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना यश येणार नाही. पण ज्यांना लोकशाही माहीत नाही. दडपशाही, फोडाफोडी माहिती आहे, त्यांचं दुसरं टार्गेट कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस असेल. कारण तोच दुसरा मोठा पक्ष आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Check Also

काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?

भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *