Breaking News

हेलिकॉप्टर दौऱ्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांची स्वप्ने कधी पूर्ण झाली नाहीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार

निवडणूका आल्या की शरद पवार हे नेहमीच तीच तीच वक्तव्ये करतात, २०१४, २०१९ आणि आताची वक्तव्ये काढून बघा त्यांची तीच वक्तव्ये असतात. देशात मोदींच्या नावांवर ३०० खासदार निवडूण जात आहेत आणि पवार म्हणतात की देशात मोदी विरोधात लाट आहे. त्यामुळे आता आम्हालाही माहित झालेय की, शरद पवार यांचीच तीच वक्तव्य असतात अशी उपरोधिक टीका करत शरद पवार यांची स्वप्ने कधी पूर्ण होत नाहीत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार जे काही बोलतात नेमके त्याच्या उलटा अर्थ आपण घ्यायचा असतो. त्यामुळे ते म्हणाले ना नरेंद्र मोदी यांची लाट नाही तर आपण समजून जायचं की मोदी यांची लाट अद्यापही आहे अशी मल्लिनाथीही केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने सध्या काम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील वक्तव्ये केली. उलवे येथील विमानतळाच्या आज हेलिकॉप्टरद्वारे पाहणीनंतर, अदानी समूहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले.

यावेळी बोलताना औरंगजेबाच्या डिपी लावण्यावरून कोल्हापूरात झालेल्या राड्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अचानक औरंगाजेबाचे उद्दातीकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. या मागचे षडयंत्र कोण करतय याचाही शोध घेतला जाईल. तसेच टिपु सुलतान आणि औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करण्यामागे कोणा एकाचाच संबध आहे का हे ही तपासून पाहिलं जाईल असंही म्हणाले.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करुन नियोजित वेळेत विमानतळ वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे प्रतिपादनही केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते, उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाला मेट्रो-लोकलने जोडणार

नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला अधिक गती द्यावी, हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट जनतेला देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

विमानतळाविषयी -:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरचा सीलिंक महत्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

१६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादी, सिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *