Breaking News

शिवसेनाः दोन्ही गटातील ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसा लेखी म्हणणे सादर करण्यास सात दिवसांची मुदत

शिवसेना नेमकी कोणाची आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला. विशेष म्हणजे त्यास येत्या ११ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रेबाबतच्या कारवाईस सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या ५४ आमदारांना नोटीसा पाठवित आपले म्हणणे कळविण्यास सांगण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १४ आमदारांना ही नोटीस जारी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही प्रत त्यांना पाठवली आहे.

राहुल नार्वेकर हे आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतं आहे. त्यांनी शिवसेनेला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नोटीस बजावली आहे. शिवसेनच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला आहे. यावेळी आमदारांना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या काही आमदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता मुंबईतील बहुतांष आमदारांना नोटीसा मिळाल्याच्या माहितीला दुजोरा दिला असून विधानसभा अध्यक्षांकडे आपले म्हणणे लवकरच मांडणार असल्याचे सांगितले.

Check Also

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *