राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नुकतेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेला येवल्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधण्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. काल येवल्यातील पहिल्याच जाहिर सभेत बोलताना शरद पवार यांनी माझा अंदाज कधी चुकत नसतो. पण यावेळी चुकला असे सांगत मी तुमची माफी मागायला आलोय असे सांगत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यावर काल जाहिर केल्याप्रमाणे शरद पवार यांच्या जाहिर सभेनंतर आपले मत मांडणार असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहिर केले. त्यानुसार आज सकाळी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
यावेळी छगन भुजबळ बोलताना म्हणाले, येवल्यातील कांदा उत्पादक मला येऊन सातत्याने भेटत होते. त्यावेळी मीच तुम्हाला सुचविले होते मी येवल्यातून लढतो म्हणून असे सांगत शरद पवार यांच्या दाव्यातील हवा काढून घेत ते पुढे म्हणाले मुंबई-पुणे ते गोंदियापर्यंत तुम्ही किती लोकांची आणि कुणाकुणाची माफी मागणार आहात ? असा खोचक सवालही केला.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, जे बाहेर गेले त्या मध्ये तुमच्याच घरातला माणूस असताना पहिली सभा बारामतीत का घेतली नाही? आंबेगाव मध्ये का घेतली नाही? असा सवाल करत मी केवळ ओबीसी नेता आहे म्हणून तुम्ही माझ्या मतदारसंघात आलात का? असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी येवल्याच्या जनतेची माफी मागितली. मी चुकीचा उमेदवार दिला, असंच त्यांना म्हणायचं होतं. त्या आधी ते येवल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं होतं. बारामतीनंतर येवल्याचाच विकास झाला. येवल्याचं प्रशासकीय संकूल आदर्श मॉडेल झालं पाहिजे. सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असली पाहिजे, असं ते म्हणाले होते, याची आठवण करून शरद पवार यांना करून देत तुमच्या नावाला काही लागेल असे कोणतेही काम केले नाही असे सांगितले.
छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या माफी मागण्यावरून टीका करताना म्हणाले, शरद पवार येवल्यात का आले ते कळलं नाही. हा ओबीसीचा नेता आहे, त्याच्याकडे गेलं पाहिजे असं वाटलं असेल. साहेब तुम्ही माफी किती मागणार? किती जणांची माफी मागणार? ५० ठिकाणी माफी मागणार आहात का? किती ठिकाणी माफी मागणार? गोंदियापासून लातूरपर्यंत माफी मागणार का? असा सवाल केला. दिलीप वळसे पाटील तुमचे पीए होते. तुमच्यासोबत त्यांचे वडील होते. त्यांच्या आंबेगावला मिटिंग घ्यायचं ठरवूनही मिटिंग घेतली नाही, असा उपरोधिक टोलाही लगावला.
साहेब हे झालं कुठून? तुमच्या घरातून झालं. ६२ वर्ष तुम्ही ज्यांना सांभाळलं ते अजित पवार उपमुख्यमंत्रीही झाले. ही सर्व मंडळी का गेली? याचा विचार करा ना? प्रफुल्ल पटेल का जातात? ते तर तुमच्या सर्वात जवळचे होते. सोनिया गांधी असो की पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांशी चर्चा करायला तुम्ही पटेलांनाच पाठवायचा ना? मग हे सर्व का सोडून गेले. याचा विचार करा, असं आवाहनही छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केले.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, तेलगी प्रकरणात कारण नसताना मला राजीनामा द्यायला सांगितला. मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सीबीआयने माझी चौकशी केली. सीबीआयच्या एफआयआरमध्ये माझं नाव नव्हतं. त्यानंतर मला अनेक ठिकाणी निवडणुकीसाठी मागणी आली. जुन्नरपासून येवल्यापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मतदारसंघातून उभं राहण्याची विनंती केली, असा गंभीर आरोप केला.
शरद पवार यांनी जुन्नरमधून लढण्यात सांगितलं. त्या चर्चेत १५ दिवस, महिना गेला. लासलगाव आणि येवल्यातील लोक येत होते. येवल्यातून लढण्याची ऑफर देत होते. मी त्यांना विचारलं कशासाठी माझ्या नावाचा आग्रह धरता. तर ते म्हणाले, आमचा तालुका दुष्काळग्रस्त आहे. विकास झालेला नाही. त्यामुळे तुम्ही या. त्यामुळे मी पवारांना सांगितलं मी येवल्याला जातो. तिथं विकास नाही याची आठवणही छगन भुजबळ यांनी करून दिली.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, मला शरद पवारांनी येवल्याला पाठवलं नाही. मीच येवल्याला जातो म्हणून शरद पवार यांना सांगितलं होतं. तिथून जिंकून येणं सोपं नव्हतं. एकदा नव्हे तर चारवेळा लोकांनी निवडून दिलं. कारण मी येवल्याचा विकास केला. काम केलं होतं. एकदा तिकीट दिलं जातं, निवडूनही आणलं जातं. पण वारंवार निवडून आणता येत नाही. त्यासाठी काम करावं लागतं. ते मी केलं असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांना लगावला.