Breaking News

शिवराज्याभिषेक दिनी मुंबईसह रायगडावर ‘या’ कार्यक्रमांचे आयोजन रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार, ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे १ ते ६ जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

याशिवाय, १ जून ते ७ जून या काळात गेटवे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. १ जून रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य, २ जून रोजी राजस्थानी लोककला, ३ व ४ जून रोजी महाराष्ट्राची लोककला तसेच ५ ते ७ जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच १ ते ७ जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विनामूल्य सन्मानिका शिवाजी नाट्य मंदिर, दादर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दामोदर हॉल, परळ, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, गडकरी रंगायतन, ठाणे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे, येथे उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा २ व ६ जून २०२३ रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास येणाऱ्या शिवभक्त जनतेसाठी अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांसह त्यांच्या स्वागत आणि तत्पर सेवेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या शिवराज्याभिषेकाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणारी शिवभक्तांची प्रचंड गर्दी पाहाता रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३३ समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

शिवभक्तांच्या आरोग्यासाठी सुविधा

नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज सदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, नियंत्रण कक्ष, निवारा कक्ष, आराम कक्ष या ठिकाणी त्याचबरोबर एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. शिवभक्तांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या ४ तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या १६ ॲब्म्युलन्स सज्ज ठेवल्या आहेत. पार्किंग, गड पायथा, पायरीमार्गावर प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर आणि गडावर आरोग्य अधिकारी, तज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण २४ वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून १०४ डॉक्टर्स व ३५० आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत.

सोहळ्यावर राहणार सीसीटीव्ही, ड्रोनचे लक्ष

सोहळ्याला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम, वॉकी टॉकी, हॅम रेडिओ, पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट, वीज अटकाव यंत्रणा आदि साधन-साहित्यांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. यासह सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे.

अग्निशमन व्यवस्था सज्ज

पार्किंग, बस डेपो, गड पायथा, गडावरील सर्व मंडप, भोजन कक्ष अशा सर्व आवश्यक ठिकाणी एकूण चार अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

शिवभक्तांच्या वाहनांकरिता वाहनतळ व्यवस्था; एसटीच्या १५० बसेस तैनात

संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मार्गांनी रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयीस्कर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गाने येणाऱ्या वाहनांकरिता कोंझर पार्किंग क्रमांक एक व कोंझर पार्किंग क्रमांक दोन, वालसुरे पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, कवळीचा माळ तसेच पुणे, ताम्हाणी,निजामपूर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था ही कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत १५० बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.

रायगड जिल्हा प्रशासनातर्फे मंडप, वीजपुरवठा, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे व वापरावयाचे पाणी, भोजन, स्नानगृह व शौचालय, स्वच्छता, कचरा, परिवहन, पार्किंग, रोप-वे, रस्ते, मोबाईल नेटवर्क, पोलीस बंदोबस्त, सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ल्याचे सौंदर्यीकरण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींचे नियोजन करण्यात आले आहे.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *